
Mumbai : मुंबईच्या रितू तावडे यांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. वाकोला येथील मुंबई महापालिकेच्या उर्दू माध्यम शाळेत शिक्षकांना मारहाण केल्याच्या प्रकरणात त्यांचा आरोपमुक्तीचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे आता या प्रकरणात खटला चालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.याबद्दलचे वृत्त महाराष्ट्र ट्राइम्स यांनी दिले आहे.
२९ जुलै २०१६ रोजी वाकोला येथील शास्त्री नगर परिसरातील उर्दू माध्यम शाळेत ही घटना घडली होती. शिक्षिका शाहीन खान यांची बदली वांद्रे-कुर्ला संकुलात करण्यात आल्याने त्यावेळी भाजपच्या नगरसेविका असलेल्या रितू तावडे आणि इतर काही जण नाराज होते. त्यानंतर तावडे आणि सहकाऱ्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापिका शरीफा मोमिन यांच्याशी वाद घातल्याचा आरोप आहे.
वाद वाढल्यानंतर रितू तावडे यांनी मोहम्मद याकुब रशीद आणि नदीम अहमद शेख या दोन शिक्षकांना मारहाण केल्याचा आरोप एफआयआरमध्ये नमूद आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रातही खळबळ उडाली होती.
न्यायालयात तावडे यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद मांडला की, त्या घटनास्थळी केवळ योगायोगाने उपस्थित होत्या आणि त्यांचा कोणताही गुन्हेगारी हेतू नव्हता. तसेच हा एफआयआर १३ दिवसांच्या विलंबाने नोंदवण्यात आला असून फिर्यादींनी राजकीय हेतूने प्रकरण वाढवले, असा दावा करण्यात आला.
सरकारी वकील इक्बाल सोलकर यांनी न्यायालयात सांगितले की, या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत आणि पीडित शिक्षकांनी तावडे यांच्यावर थेट मारहाणीचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांवर हल्ला होणे गंभीर बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. पी. मानथकर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तावडे यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे नमूद केले. तसेच आरोप निश्चितीच्या टप्प्यावर पुराव्यांची सखोल छाननी अपेक्षित नसते, असे स्पष्ट करत त्यांनी अर्ज फेटाळून लावला.