
Raj Thackeray Gudhi Padwa Melava 2026 : मुंबईतील शिवाजी पार्क येथे दरवर्षीप्रमाणे मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, राज्यभरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत.
या मेळाव्यात राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून त्यांच्या भाषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी राजकीय घडामोडी, पक्षाची रणनीती आणि पुढील भूमिका यावर ते महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीनंतर हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा असल्याने या युतीवर राज ठाकरे काय भूमिका मांडणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानात विशेष दोन मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दूरवर बसलेल्या कार्यकर्त्यांनाही संपूर्ण कार्यक्रम आणि भाषण स्पष्टपणे पाहता येणार आहे. या स्क्रीनवर कोणते व्हिडिओ दाखवले जाणार, याकडेही लक्ष लागले आहे.
या भव्य मेळाव्याला संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. यापूर्वी पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत आगामी रणनीतीवर चर्चा झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या मेळाव्यात राज ठाकरे महत्त्वाचे निर्णय जाहीर करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.