
मुंबई: मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान घडलेल्या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लोकल ट्रेनमधून पडल्यामुळे हे बळी गेले. सकाळी फास्ट लोकल एकमेकांच्या अगदी जवळून जात असताना ही घटना घडली. या दुर्घटनेने मुंबईकरांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. आता या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांनी या अपघातावर तीव्र संताप व्यक्त करत म्हटलं, "या देशात माणसांची किंमत राहिलेली नाही. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी निरर्थक आहे. त्यापेक्षा त्यांनी स्वतः तिथे जाऊन परिस्थितीची पाहणी करावी." ते पुढे म्हणाले, “रेल्वेने प्रवास केल्याचा माझा अनुभव आहे. आधी गर्दी कमी होती, पण आज ती अनियंत्रित झाली आहे. जे ठिकाण अपघातस्थळ आहे, ते काही नवीन नाही. तो परिसर नेहमीच धोकादायक आहे. तरीही उपाययोजना शून्यच राहिल्या आहेत.”
राज ठाकरे यांनी केवळ रेल्वेच नव्हे, तर संपूर्ण मुंबई शहरातील अपुऱ्या सुविधांवरही बोट ठेवलं. “मुंबईमध्ये नीट रस्ते नाहीत, पार्किंगची सोय नाही, आगी लागल्या तर अग्निशमन दल पोहोचू शकत नाही, आणि लोकसंख्येचा विस्फोट होत असताना कोण कुठून येतंय हेच कळेनासं झालंय.” त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, "मोनोरेल, मेट्रो आहेत, पण त्यांचा वापर कोणी आणि कसा करतो, याकडे कुणी लक्ष देत नाही. मुंबई आणि अन्य मेट्रो शहरांमध्ये उंच इमारती वाढत आहेत, पण मूलभूत सुविधा मात्र ठप्प आहेत. ही अवस्था शहर म्हणून लाजीरवाणी आहे."
राज ठाकरे म्हणाले, "मुंबईच्या लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. जगातील कुठल्याही देशात अशी व्यवस्था असती, तर ते आधी सुरक्षेवर भर दिला असता. पण आपल्याकडे लोकांचे जीव गमावले तरी व्यवस्था ढिम्म!"
या दुर्घटनेनंतर केवळ भावनिक प्रतिक्रिया नव्हे, तर ठोस उपाययोजना अपेक्षित आहेत. राज ठाकरे यांनी याच मुद्द्यावर भाष्य करत म्हटलं, "केंद्र सरकारने आता तरी डोळे उघडावेत. रेल्वेच्या दयनीय स्थितीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं."