मुंब्रा आणि दिवा स्थानकांच्या दरम्यान लोकल ट्रेनमधून ८ प्रवासी अचानक रेल्वे ट्रॅकवर पडले, यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून उर्वरितांवर सध्या उपचार सुरू आहेत.
मुंबई - मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर सोमवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. मुंब्रा आणि दिवा स्थानकांच्या दरम्यान लोकल ट्रेनमधून ८ प्रवासी अचानक रेल्वे ट्रॅकवर पडले, यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून उर्वरितांवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेने रेल्वे व्यवस्थेतील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, प्रशासनाला तात्काळ उपाययोजना कराव्या लागल्या आहेत.
काय घडलं नेमकं?
मध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार:
सीएसएमटीकडून आणि कसराकडून येणाऱ्या दोन लोकल गाड्या समोरासमोर क्रॉस होत असताना अपघात घडला.
दोन्ही गाड्यांतील काही प्रवासी ट्रेनच्या दाराशी उभे होते.
गर्दीमुळे किंवा एकमेकांना धडक लागल्यामुळे ८ प्रवासी खाली पडले.
ट्रॅकवर पडलेल्या प्रवाशांना स्थानिकांनी मदत करून रुग्णालयात पोहोचवले.
सध्या कळवा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची चौकशी सुरु
अपघाताच्या ठिकाणी सीसीटीव्ही होता का?
गाड्यांमधील अंतर किती होतं?
प्रवाशांमध्ये भांडण होतं का?
अपघाताची नेमकी कारणमीमांसा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तपास सुरु केला आहे.
रेल्वेचं मोठं पाऊल : लोकलमध्ये बंद होणारे दरवाजे
या भीषण घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे:
प्रत्येक नव्या कोचमध्ये ‘ऑटोमॅटिक दरवाजे’ बसवले जाणार.
सध्या वापरात असलेल्या लोकल डब्यांचं रीडिझाईनिंग करून त्यातही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार.
सुरुवातीला हा अपघात पुष्पक एक्स्प्रेसशी संबंधित असल्याची अफवा पसरली होती, पण प्रशासनाने ती स्पष्टपणे फेटाळली आहे.
रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल
ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची सहावी लाईन उभारण्याचं काम सुरू आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संपूर्ण सिस्टम अपग्रेड करण्यावर भर दिला जाणार आहे.
मुंबईच्या लोकल प्रवासात दिवसेंदिवस वाढणारी गर्दी आणि सुरक्षेची कमतरता यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे. या अपघाताने पुन्हा एकदा लोकलमधील सुरक्षेचं गांभीर्य समोर आलं आहे. रेल्वेने घेतलेले निर्णय स्वागतार्ह असले तरी ते लवकरात लवकर प्रत्यक्षात उतरवणे ही खरी गरज आहे.