
मुंबई : मुंबई-पुणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा काही भाग कोसळल्याची घटना अलीकडे घडली. यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर राजकारणाचा आरोप केला जात असल्याबद्दलही राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली.
राज ठाकरे म्हणाले की, मिसिंग लिंकसाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र या प्रकल्पाचा भाग कोसळल्यानंतर नागरिकांनी प्रश्न विचारणे स्वाभाविक आहे. त्यावर चर्चा झाली की राजकारण केल्याचा आरोप केला जात आहे. “मिसिंग लिंकवर खांब कोसळला, पाणी साचलं आणि त्यावर बोललं तर ते राजकारण ठरतं. मग विरोधात असताना केलेली आंदोलने आणि टीका राजकारण नव्हती का?” असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा संदर्भ राज ठाकरेंनी दिला. त्यांनी म्हटले की, एखाद्या प्रकल्पातील त्रुटींवर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नव्हे. “लोक मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत. त्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आहे? लोकांनी प्रश्न विचारायचे नाहीत का?” असा सवाल करत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी यावेळी केंद्र सरकारवरही अप्रत्यक्ष टीका केली. “केंद्र सरकारच्या एखाद्या गोष्टीवर टीका केली की देशद्रोही ठरवले जाते. आता राज्यातही तसाच प्रकार सुरू झाला आहे,” असे ते म्हणाले. सरकारविरोधात मत व्यक्त करणाऱ्यांना लक्ष्य करण्याची प्रवृत्ती वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजप नेते या घटनेला ‘नैसर्गिक’ कारणे जबाबदार असल्याचे सांगतात. तसेच “सरकार तुमचं असेल तर सर्व काही नैसर्गिक, पण दुसऱ्यांचं सरकार असेल तर त्यावर राजकारण करायचं, हा कोणता न्याय?” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
मुंबईतील पावसानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवरही राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. याआधी अधिक पाऊस पडूनही ज्या मुद्द्यांवर आंदोलने केली जात होती, त्याच समस्या आजही कायम आहेत. पूर्वी पावसामुळे मुंबई तुंबली की सरकारवर टीका केली जायची. आता कमी पाऊस पडूनही तीच परिस्थिती आहे, मग प्रश्न विचारू नयेत का? असा प्रश्नही विचारला.
काही दिवसांपूर्वी मुंबई आणि पुणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. रेल्वे रुळांवर पाणी साचले गेले. दरडी कोसळल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग काही काळासाठी बंद ठेवावा लागला होता. त्याचवेळी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले गेले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. या पार्श्वभूमीवर ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली. त्यानंतर या प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले.