
Navi Mumbai Fire : नवी मुंबईच्या कामोठे परिसरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी दुर्घटना घडली. सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा सहकारी सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर रात्री अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे घरात आग लागली आणि काही क्षणांतच ती संपूर्ण मजल्यावर पसरली. ही घटना रूम क्रमांक 301 मध्ये घडली होती.
आगीची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ इमारतीतून बाहेर पळ काढला. तोपर्यंत अग्निशमन दलाच्या पाच गाड्या** घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जवानांनी इमारतीवर चढून पाण्याचा मारा सुरू केला आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
आगीच्या वेळी घरातील तीन सदस्यांनी बाहेर पडण्यात यश मिळवले, मात्र आई आणि मुलगी आतच अडकून पडल्या. अग्निशमन दलाने त्यांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली, पण आगीच्या तीव्रतेमुळे दोघींचाही होरपळून मृत्यू झाला. दोघी आत कशा अडकल्या याबाबत अजूनही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
दिवाळीच्या सणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कामोठे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.
मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागातील सरदार वल्लभभाई पटेल हॉल मध्ये सोमवारी मध्यरात्री भयंकर आग लागली. फटाक्यांमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना बारा वाजता घडली आणि काही क्षणांतच संपूर्ण हॉल जळून खाक झाला. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र हॉलचे मोठे नुकसान झाले.
मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील सहार रोडवरील एका व्यावसायिक इमारतीत काही दिवसांपूर्वी आग लागली होती. पहाटेच्या सुमारास लागलेल्या या आगीत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून धूर निघत असल्याचे नागरिकांनी पाहिले आणि तात्काळ अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून अनेकांना सुरक्षित बाहेर काढले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे दोन तास लागले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ऑफिसमधील कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले.