
Shivajirao Kardile death : अहिल्यानगर तालुक्याचे ज्येष्ठ भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे तालुक्यातील भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सलग तीन टर्मपर्यंत आमदार म्हणून सेवा केलेल्या कर्डिले यांच्या जाण्याने स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलणार आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटांच्या आरक्षण सोडती जाहीर झाल्यानंतर नगर तालुक्यात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात थेट सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
आता कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे वाळकी गटातून राजकीय रणांगणात उतरण्याची शक्यता आहे. या गटात मागील तीन कार्यकाळांपासून वर्चस्व राखणारे माजी बांधकाम समिती सभापती बाळासाहेब हराळ हे त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी ठरू शकतात.
दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले आणि शरद झोडगे यांच्या गटांना अनुसूचित जातीसाठी आरक्षण लागू झाल्याने त्यांचे राजकीय भविष्य धोक्यात आले आहे.
सद्यस्थितीत नगर तालुक्यातील बहुतांश संस्थांवर भाजप आमदार कर्डिले यांचेच वर्चस्व होते. त्यांच्या जाण्यानंतर तालुक्यातील सत्तासंतुलन बिघडू शकते. माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या निधनानंतर महाविकास आघाडी कमजोर झाली असून तिचं नेतृत्व सध्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्याकडे आहे.
महाविकास आघाडीतील माजी सदस्य संदेश कार्ले, डॉ. दिलीप पवार, शरद झोडगे, गुलाब शिंदे, रामदास भोर यांनी अलीकडेच शिंदे गटाशी जवळीक साधली आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकारणात नव्या आघाड्यांची चर्चा रंगू लागली आहे.
हे दोन गट या निवडणुकीत सर्वाधिक गाजणार आहेत. निंबळक गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, अरुण होळकर, तसेच माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, विजय शेवाळे आणि बंडू सप्रे यांच्या नावांची चर्चा आहे.
जेऊर गटातून माजी सदस्या भाग्यश्री मोकाटे आणि घाटाखालच्या गावांतील अनेक इच्छुक तयारीत असल्याचं समजतं.
वाळकी जिल्हा परिषद गट पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. मागील निवडणुकीत अभिलाष घिगे यांना पुढे करून बाळासाहेब हराळ यांना रोखण्याचा प्रयत्न झाला होता, पण यंदा परिस्थिती बदलली आहे. आमदार कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्या नावावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली असून वाळकी गटातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीची मागणी सुरू केली आहे.
अलीकडेच तहसील कार्यालयात प्रांताधिकारी सुधीर पाटील आणि तहसीलदार संजय शिंदे यांच्या उपस्थितीत पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम झाला. या सोडतीचं उद्घाटन सहा वर्षीय तनिष्का पंगुडवाले या बालिकेच्या हस्ते करण्यात आलं.