मुंबईकरांनो लक्ष द्या! 11-12 ऑगस्टला 'या' भागांत पाणी येणार नाही; BMC ची महत्त्वाची सूचना

Published : Aug 07, 2026, 09:37 AM IST
Water Cut in Mumbai

सार

मुंबईतील H-पूर्व आणि K-दक्षिण विभागात वैतरणा जलवाहिनीच्या देखभाल कामामुळे 11 ते 12 ऑगस्टदरम्यान काही भागांत पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

मुंबई : मुंबईतील H-पूर्व (H-East) आणि K-दक्षिण (K-South) विभागातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. मुंबई महापालिकेकडून (BMC) 2,400 मिमी व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यामुळे येत्या 11 ऑगस्ट सकाळी 10 वाजल्यापासून 12 ऑगस्ट सकाळी 10 वाजेपर्यंत काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. 

H-पूर्व विभागातील 'या' भागांत पाणीपुरवठा बंद

11 ऑगस्ट ते 12 ऑगस्टदरम्यान H-पूर्व विभागातील आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, हँगर कर्मचारी वसाहत, एअर इंडिया कॉलनी, सांताक्रूझ (पूर्व), वांद्रे रेल्वे टर्मिनस आणि वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) या भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.तसेच 12 ऑगस्ट रोजी सांताक्रूझ (पूर्व), खार (पूर्व) आणि वांद्रे (पूर्व) येथील काही भागांमध्येही पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

K-दक्षिण विभागात वेळेनुसार कमी दाबाने पाणीपुरवठा

K-दक्षिण विभागातील कबीर नगर, बामणवाडा, पारशीवाडा, विमानतळ परिसर, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, मासळी बाजार, घाटीवाडा, चकाला आणि P&T वसाहत या भागांत 11 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5.30 या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत कोलडोंगरी, ओल्ड पोलीस लेन, विजय नगर (सहार रोड) आणि मोगरापाडा येथे कमी दाबाने पाणी मिळणार आहे.

12 ऑगस्टला सकाळीही परिणाम कायम

देखभाल कामामुळे 12 ऑगस्ट रोजी पहाटे 5 ते सकाळी 8 या वेळेत सहार गाव, सुतार पाखाडी आणि कार्गो संकुल परिसरातही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना काही काळ पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

पालिकेचे नागरिकांना आवाहन

देखभाल कामामुळे पाणीपुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होणार आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी आधीच साठवून ठेवावे आणि त्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Dharavi Redevelopment : धारावीचा चेहरामोहरा बदलणार! अदानी ग्रुपकडून माटुंग्यात 10,432 घरांच्या बांधकामाला सुरुवात
Old Monk FSSAI Dispute : 'ओल्ड मंक'ला आता 'रम' म्हणता येणार नाही? FSSAI च्या अटीमुळे कंपनीला 500 कोटींचा फटका