शिवाजी पार्कचे रुप बदलणार, धुळीवर कायमचा उपाय आणि कट्ट्याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेचे आदेश

Published : Jul 30, 2025, 10:34 AM IST
Shivaji Park

सार

मुंबईतील शिवाजी पार्कचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहेत. या संदर्भात महापालिकेने लाल माती आणि गवत लागवड करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. 

मुंबई : मुंबईच्या दादर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे केवळ ऐतिहासिक मैदानच नाही, तर स्थानिक नागरिकांसाठी एक महत्त्वाचे विरंगुळ्याचे ठिकाण देखील आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून येथील धुळीची समस्या नागरिकांना त्रासदायक ठरत होती. यावर तोडगा काढत, मुंबई महापालिकेने (BMC) मैदानावर गवत लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

धुळीवर कायमस्वरूपी तोडगा

प्रत्येक हिवाळ्यात या मैदानातील लाल माती वाऱ्याने उडून आजूबाजूच्या परिसरात धूळ भरते. यामुळे श्वसनाचे आजार आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होत होत्या. अनेक वेळा स्थानिक रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी स्वतः मंगळवारी मैदानाची पाहणी केली. त्यानंतर धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गवत लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

IIT तज्ज्ञांची मदत आणि देखभाल सुधारणा

या कामासाठी IIT मुंबईच्या तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. मैदानात हिरवळ वाढवण्याच्या उद्देशाने तत्काळ गवत लागवड सुरू करण्यात आली आहे. यासोबतच, मैदानाची देखभाल, दुरुस्ती आणि स्वच्छतेबाबतही महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. या उपाययोजनांमुळे मैदान अधिक आकर्षक होणार असून, नागरिकांना स्वच्छ, आरोग्यदायी आणि धुळीपासून मुक्त वातावरण मिळण्याची शक्यता आहे.

कट्ट्याच्या दुरवस्थेची दखल, लवकरच दुरुस्ती

दरम्यान, शिवाजी पार्कच्या भोवतालच्या कट्ट्याची दुरवस्था देखील नागरिकांच्या तक्रारींचा विषय ठरली होती. अनेक वर्षांपूर्वी सुशोभित केलेला हा कट्टा, आता निखळलेल्या मार्बल तुकड्यांमुळे अपूर्ण अवस्थेत आहे. याची दखल घेत आयुक्त गगराणी यांनी कट्ट्याचीही पाहणी केली. त्यांनी लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

नागरिकांसाठी मोठा दिलासा

शिवाजी पार्क हे मैदान सकाळी-संध्याकाळी फिरण्यासाठी, बसण्यासाठी आणि सामाजिक संवादासाठी अनेकजण येतात. त्यामुळे मैदानाची व कट्ट्याची जीर्ण अवस्था नागरिकांच्या वापरात अडथळा ठरत होती. महापालिकेच्या या निर्णयामुळे, स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. लवकरच मैदान अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि सुशोभित होईल अशी अपेक्षा आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!
Mumbai : महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीमसागर; इंदू मिल स्मारक पुढील वर्षी पूर्ण होणार- मुख्यमंत्र्यांची घोषणा