
Mumbai Rain : मुंबईकरांसाठी आजची सकाळ आनंदाची ठरली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे आणि दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, आज सकाळी अचानक ढग दाटून आले आणि मुंबईच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. उपनगरांसह शहरातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईच्या दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरात सकाळपासूनच हलक्या पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या ढगांमुळे वातावरणात बदल झाला आणि काही मिनिटांतच पावसाच्या सरी कोसळू लागल्या. या पावसामुळे तापमानात घट झाली असून परिसरात गारवा निर्माण झाला आहे. सकाळच्या वेळेत कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनाही या पावसाचा सुखद अनुभव मिळाला.
फक्त उपनगरांपुरताच पाऊस मर्यादित राहिला नाही, तर मुंबई शहरातील दादर, कुर्ला, प्रभादेवी, लालबाग आणि आसपासच्या भागांतही पावसाने हजेरी लावली. विशेषतः कुर्ला परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत असून रस्त्यांवर पाण्याचे छोटे साचेदेखील दिसून येत आहेत. वातावरण पूर्णपणे ढगाळ झाले असून पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. राज्यातील इतर भागांमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र, मान्सून अधिकृतपणे महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वीच राज्यातील अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून उष्णतेचा प्रभाव कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमानाचा पारा वाढला होता. त्यात दमट हवामानामुळे नागरिकांची अक्षरशः घालमेल होत होती. आजच्या पावसामुळे मात्र हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईसोबतच पालघर जिल्ह्यातही पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. ग्रामीण भागात काळे ढग दाटून आले असून वातावरण पूर्णपणे बदलले आहे. शेतकरी आणि नागरिक दोघांसाठीही हा पाऊस दिलासादायक मानला जात आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनच्या प्रगतीला अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि राज्यातील विविध भागांत पावसाच्या सरी कायम राहू शकतात. मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने सरकत असल्याने येत्या आठवड्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.