
Mumbai : दिवाळीच्या सणाच्या कालावधीत राजभवनातून एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. निशिकांत देशपांडे यांची राज्यपालांचे प्रबंधक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) म्हणून पदोन्नती देण्यात आली असून, त्यांनी राज्य शासनातील अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे.
निशिकांत देशपांडे यांनी यापूर्वी जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, पर्यटन आणि क्रीडा अशा विविध खात्यांमध्ये मंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे आणि कार्यक्षमतेमुळे राज्यपालांचे प्रबंधक म्हणून त्यांची ही महत्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या भूमिकेत ते राजभवनाच्या प्रशासनात प्रमुख भूमिका निभावणार आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी महायुतीतील प्रथमच निवडून आलेल्या आमदारांना विशेष भेट दिली आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर करून वितरित केला आहे. ही योजना दलित वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांसह विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणारी आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आमदार आणि लोकप्रतिनिधींनी निधीसाठी पाठपुरावा केला होता. सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी उपलब्ध निधी आणि मागणीतील समतोल राखत फक्त प्रथमच निवडून आलेल्या महायुती आमदारांना 2 कोटींचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला. दिवाळीपूर्वीच हा निधी वितरित झाल्यामुळे संबंधित आमदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे आणि दलित वस्त्यांतील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.