मुंबई: दिवाळीच्या आधीच मेट्रो प्रवाशांना एक आठवड्याचा "मेगाहाल" सहन करावा लागू शकतो. १२ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मुंबई मेट्रोच्या मार्गिका 2A (दहिसर – डीएन नगर) आणि मार्गिका 7 (दहिसर ईस्ट – अंधेरी ईस्ट) वर सकाळच्या वेळापत्रकात मोठे बदल होणार आहेत.
एमएमआरडीए (MMRDA) कडून दिलेल्या माहितीनुसार, या काळात मार्गिका 7 आणि 9 (पहिला टप्पा) यांचं जोडणीचं आणि अत्यावश्यक प्रणाली एकत्रीकरणाचं (System Integration) काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही मेट्रो सेवा सकाळच्या वेळात थोडा उशिराने सुरु होतील.
ही तांत्रिक कामं अंधेरी (पूर्व) ते मिरा-भाईंदर दरम्यान करण्यात येणार असून, प्रवाशांच्या दीर्घकालीन सोयीसाठी ही महत्त्वाची पायरी आहे. एकदा हे काम पूर्ण झाल्यावर प्रवाशांना अधिक सुसज्ज, जलद आणि अखंड सेवा मिळणार आहे.