Mumbai Mayor : मुंबईला नवा महापौर ठरला, भाजपकडून रितू तावडे तर शिवसेनेकडून संजय घाडी उपमहापौर

Published : Feb 07, 2026, 11:49 AM IST
mumbai pune women mayor bmc seat reservation lottery controversy shivsena

सार

Mumbai Mayor : मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून संजय घाडी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संख्याबळाच्या जोरावर महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे.

Mumbai Mayor : मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार, या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने रितू तावडे यांना मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी राखीव असल्याने मुंबईला पुन्हा एकदा महिला महापौर मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने संजय घाडी यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी दिली आहे.

उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांची निवड

मुंबईतील प्रभाग क्रमांक ५, मागाठाणे येथील नगरसेवक संजय घाडी यांना शिवसेनेकडून उपमहापौरपदाचे तिकीट देण्यात आले आहे. शिवसेनेने स्पष्ट केले आहे की उपमहापौरपदाचा कार्यकाळ सव्वा वर्षांचा असेल. महायुतीकडील संख्याबळ पाहता महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांवर विजय निश्चित असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

शिवसेनेकडून अधिकृत परिपत्रक जारी

शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौरपदासाठी संजय शंकर घाडी यांचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या संदर्भात शिवसेनेकडून परिपत्रक काढण्यात आले असून, संबंधित सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नगरसेवकांना आदेशाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आज उमेदवारी अर्जांची अंतिम मुदत

महापौर आणि उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज, ७ फेब्रुवारी रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना महायुतीकडून दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. यावेळी सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विरोधकांकडूनही उमेदवार देण्याची शक्यता

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि काँग्रेसकडूनही महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येणारी निवडणूक औपचारिक वाटत असली तरी राजकीय रंगत वाढण्याची चिन्हे आहेत.

संख्याबळामुळे महायुतीचा मार्ग सोपा

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर महापौरपद कुणाच्या ताब्यात जाणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र गटनोंदणी केली असून, राष्ट्रवादी काँग्रेसनेही गटनोंदणी पूर्ण केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. नगरसेवकांचे संख्याबळ पाहता ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा मार्ग तुलनेने सोपा मानला जात आहे.

महापालिकेतील समित्यांच्या अध्यक्षपदासाठी चढाओढ

महापौर-उपमहापौर निवडीनंतर आता भाजप आणि शिवसेनेमध्ये स्थायी समिती अध्यक्ष, सुधार समिती, शिक्षण समिती, बेस्ट समितीसह विविध महत्त्वाच्या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Crime : मालाडमधील शाळेत धक्कादायक प्रकार; पाच वर्षांच्या चिमुकलीशी शिपायाचे गैरवर्तन, पालकांचा संताप
मुंबई विद्यापीठाने आमंत्रण रद्द करण्यामागे काय कारण? नसीरुद्दीन शाह यांचा आरोप