
BMC Mayor 2026 : मुंबई महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम (BMC Mayor 2026) अखेर निश्चित झाला आहे. 7 फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्वीकारले जाणार असून, 11 फेब्रुवारी रोजी विशेष सभेत महापौरपदाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. याच दिवशी दुपारी 12 वाजता विशेष सभा होणार असून सभागृह भरण्याच्या 15 मिनिटे आधी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अंतिम निकालानुसार भाजपचा महापौर होणे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्याचवेळी सत्तावाटपाच्या सूत्रानुसार शिंदे गटाच्या शिवसेनेला उपमहापौरपद आणि सुधार समिती मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये उपमहापौरपदी महिलेची निवड केली जाणार असल्याचे संकेत असून सुधार समितीचे अध्यक्षपद पुरुष नगरसेवकाकडे दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
उपमहापौरपदासाठी तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. तृष्णा विश्वासराव 2014 मध्ये सभागृह नेत्या होत्या, तर त्याच काळात अनुसूचित जाती-जमातीसाठी महापौरपद आरक्षित असताना यामिनी जाधव यांचेही नाव महापौरपदासाठी चर्चेत होते. मात्र, त्या वेळी स्नेहल आंबेकर यांची निवड झाल्याने यामिनी जाधव यांना संधी मिळाली नव्हती. आता उपमहापौरपदी नेमणूक कोणाची होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. 11 फेब्रुवारीच्या निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतच थांबण्याचे निर्देश दिले आहेत. 9 फेब्रुवारीला आंगणेवाडी जत्रेमुळे काही नगरसेवक कोकणात जाण्याची शक्यता लक्षात घेता, अतिरिक्त सावधगिरी बाळगण्यात येत आहे. ठाकरे गट, भाजप आणि शिंदे गटाने नगरसेवकांना 10 ते 15 फेब्रुवारीदरम्यान मुंबई सोडू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
एकूण : 227