
Mumbai Crime : बदलापूरमधील घटनेची आठवण करून देणारा आणखी एक धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. मालाड परिसरातील एका शाळेत पाच वर्षांच्या चिमुकलीशी शाळेतील शिपायाने गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शाळेसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिपायाने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी गैरकृत्य केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या पालकांनी तातडीने शाळा प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, आरोपीबाबत स्पष्ट माहिती देण्यास शाळा प्रशासनाने टाळाटाळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
या प्रकरणात शाळेच्या बदनामीच्या भीतीने उलट शाळेच्या सीईओने मुलीच्या पालकांवर प्रकरण बाहेर न आणण्यासाठी दमदाटी केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतले असून, शाळा प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
मुलीच्या पालकांच्या तक्रारीनंतर मालाड पोलिसांनी शाळेचा शिपाई अनिल पांचाळ (वय ३०) आणि शाळेचे सीईओ अनंत यज्ञीक (वय ६५) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघांवर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 74, 351(2) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) 2012 मधील कलम 10, 17 आणि 21(2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास मालाड पोलीस करत असून, अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासोबतच शाळेतील सीसीटीव्ही फुटेज, कर्मचारी नोंदी आणि शाळा प्रशासनाच्या भूमिकेचीही सखोल चौकशी केली जात आहे. दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेनंतर मालाड परिसरातील पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये शाळा प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित शाळेची मान्यता रद्द करून प्रशासनाची जबाबदारी निश्चित करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शाळांमधील मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.