
मुंबई : बुधवारी मध्यरात्रीनंतर गोळीबाराच्या आवाजाने गोराईतील रहिवासी खडबडून जागे झाले. नंतर त्यांना समजलं की हा गोळीबार भररस्त्यात सुरू असलेल्या एका वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा भाग होता. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी गुरुवारी २६ वर्षीय आकाश रामकृपाल गुप्ता आणि त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. गोराईमध्ये वाढदिवसाच्या जल्लोषादरम्यान BB एअरगनने हवेत गोळीबार करून इतरांच्या जीवाला किंवा सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
BB एअरगन ही एक प्रकारची एअर गन असते, ज्यातून BBs नावाच्या लहान, गोल धातूच्या गोळ्या झाडल्या जातात. या गोळ्या सहसा स्टीलच्या बनवलेल्या असतात आणि त्यांचा व्यास ४.५ मिमी (.१७७ कॅलिबर) असतो. या गनमधून वेगाने स्टीलच्या गोळ्या बाहेर पडत असल्याने त्या मानवी त्वचा सहज भेदू शकतात, डोळ्यांना गंभीर इजा करू शकतात आणि शरीरात घुसल्यास शस्त्रक्रिया करून काढाव्या लागतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशने आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी मध्यरात्रीनंतर सुमारे दहा मित्रांना जमवले होते. या टोळक्याने रस्त्यावर गोंधळ घातला आणि त्यानंतर आकाशने आपली इनोव्हा गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून वाहतूक अडवली.
त्यानंतर आकाशने गाडीच्या बोनेटवर वाढदिवसाचा केक कापला. यानंतर त्याचा मित्र जतिन नवीन शर्मा याने आपली एअर पिस्तूल दुसऱ्या मित्र विजेश उपाध्याय याला दिली आणि विजेशने हवेत दोन राऊंड फायर केले, असं पोलिसांनी सांगितलं.
The Borivali Police have booked 10 persons for allegedly creating a public nuisance while celebrating a birthday on a public road in Mumbai's Gorai area.
The incident took place near Sukhsagar Cooperative Housing Society in Gorai-2, where the group allegedly cut a birthday cake… pic.twitter.com/ARx8SRguOS— Hate Detector 🔍 (@HateDetectors) August 7, 2026
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शांतताप्रिय निवासी भागात झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. इतकंच नाही, तर या टोळक्याने या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले, ज्यामुळे हे प्रकरण पोलिसांच्या निदर्शनास आले.
या माहितीच्या आधारे, बोरिवली पोलिसांनी गुरुवारी आकाश आणि त्याच्या मित्रांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १२५ (इतरांच्या जीवितास किंवा सुरक्षिततेस धोका निर्माण करणे), १२६ (अयोग्य रीतीने अडवणूक), १८९(२) (बेकायदेशीर जमाव) आणि २८५ (सार्वजनिक रस्त्यावर धोका, अडथळा किंवा इजा निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम २०१ (वाहतुकीस अडथळा) व १२२ (अयोग्य पार्किंग) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१)(ई) व १३५ अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.