
मुंबई : मुंबई लोकलमध्ये जागेवरून झालेल्या वादाचे रूपांतर जीवघेण्या घटनेत झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशातच पुन्हा एकदा चर्चगेट-बोरिवली लोकलमध्ये माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान ६२ वर्षीय दिव्यांग प्रवाशाला धावत्या ट्रेनमधून ढकलल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर घटनेत गंभीर जखमी झालेल्या कॅजेटन डेनिस पिरेस हे जखमी झाले.
कॅजेटन पिरेस हे सांताक्रूझ पूर्व येथील रहिवासी होते. ते हँडिकॅप प्रवाशांसाठी रिझर्व्ह असलेल्या दिव्यांगजन डब्यातून प्रवास करत होते. याच डब्यात अमजद शेख हा हँडिकॅप नसून तो रिझर्व्ह सीटवर बसला. यावर पिरेस यांनी शेखला सीटवरुन उठण्यास सांगितले असता दोघांमध्ये वाद झाला.वाद ऐवढा चिघळला गेला की, शेख याने पिरेस यांना धावत्या ट्रेनमधून खाली ढकलले गेल्याचे सांगण्यात येत आहे.
घटना घडल्यानंतर डब्यातील सहप्रवाशांनी अमजद शेखला पकडून ठेवले. ट्रेन वांद्रे स्थानकात पोहोचल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) अधिकाऱ्यांना पिरेस हे गंभीर जखमी अवस्थेत रेल्वे रुळांवर आढळले. त्यांना तातडीने वांद्रे पश्चिम येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
रेल्वे पोलिसांचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर शिंदे यांच्या माहितीनुसार, अमजद शेखविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, आरपीएफ अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात अमजद शेखने वेगळा दावा केला आहे. लोकलच्या डब्यात कावळा शिरल्याचे त्याला वाटले. कावळ्याला हाकलण्याचा प्रयत्न करत असताना पिरेस यांना चुकून धक्का लागला आणि ते ट्रेनमधून खाली पडल्याचे त्याने सांगितले आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय आरोपीच्या दाव्याचीही चौकशी केली जात आहे.
प्रवाशांमधील वादातून मुंबईच्या उपनगरीय रेल्वेत यंदा घडलेली ही तिसरी जीवघेणी घटना असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेतील प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रवासी सुरक्षेसाठी काम करणारे कार्यकर्ते समीर झवेरी यांनी अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.