‘पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस’; नरेंद्र मोदींबाबत संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य

Published : Aug 20, 2026, 12:54 PM IST
Sanjay Raut - Narendra Modi

सार

राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी पुढील 6 ते 8 महिन्यांत पंतप्रधानपदी राहणार नसल्याचा दावा केल्याचे वृत्त आहे. यावर संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमती दर्शवत “17 सप्टेंबरनंतर मोठा उलगडा होईल” असे म्हटले आहे.

मुंबई : दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात बुधवारी (19 ऑगस्ट) काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाची आगामी रणनीती आणि केंद्र सरकारविरोधातील भूमिकेबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. याच बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील 6 ते 8 महिन्यांत पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असे म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर आता उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे.

‘राहुल गांधींच्या वक्तव्याशी माझं एकमत’

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना राहुल गांधींच्या दाव्याला दुजोरा देत असल्याचे सांगितले. “गेले काही महिने मीही हेच सांगत आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याशी माझं या विषयावर एकमत आहे,” असे राऊत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सध्याचा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत आणि त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीत पद सोडावे लागेल, असा दावा संजय राऊत यांनी केला. 17 सप्टेंबरनंतर या परिस्थितीचा उलगडा होईल, असेही त्यांनी म्हटले.

‘17 सप्टेंबरनंतर काय होईल ते कळेल’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. याच तारखेचा संदर्भ देत संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं. “17 सप्टेंबरनंतर काय होईल, ते कळेल. 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे. पंतप्रधान म्हणून हा त्यांचा शेवटचा वाढदिवस असेल,” असा दावा राऊत यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

‘अमित शाह कधीच पंतप्रधान होणार नाहीत’

यावेळी संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबतही भाष्य केले. “मोदी गेले तर अमित शाहही गेले,”असे म्हणत अमित शाह पंतप्रधान होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. मोदी आणि अमित शाह यांच्या राजकीय भवितव्याबाबतही राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

‘लाल किल्ल्यावरील भाषणही शेवटचं’

यापूर्वीही आपण नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरचे भाषण शेवटचे असल्याचे म्हटल्याचे राऊत यांनी सांगितले. “माझ्याकडे असलेले आकलन, राहुल गांधी जे सांगतात, तसेच आमच्यासमोर येणारी तथ्ये यावरून आम्ही हे मत व्यक्त करत आहोत,” असे राऊत म्हणाले. यंदाचा 15 ऑगस्टचा लाल किल्ल्यावरील भाषण आणि 17 सप्टेंबरचा वाढदिवस हे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील शेवटचे ठरतील, असा दावा त्यांनी केला आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai BEST Bus Fire: सायनच्या अणिक डेपोत भीषण आग, १० BEST बसेस जळून खाक; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Navi Mumbai Airport : नवी मुंबई एअरपोर्टवरून मुंबई, पुण्यासाठी स्वस्त प्रवास; बस, टॅक्सी सेवा सुरू