
मुंबई : येत्या २४ ते २७ जुलै २०२५ या कालावधीत मुंबईकरांनी समुद्रकिनाऱ्यांपासून सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या चार दिवसांत मुंबईच्या समुद्रात मोठ्या लाटांचा प्रकोप दिसून येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि हवामान विभागाने याबाबत सावधानतेच्या सूचना जारी केल्या आहेत.
मुंबई किनारपट्टीवर येणाऱ्या भरतीचा अंदाज पुढील प्रमाणे आहे.
२४ जुलै (गुरुवार) – सकाळी 11:57 वाजता, लाटांची उंची: 4.57 मीटर
२५ जुलै (शुक्रवार) – दुपारी 12:40 वाजता, लाटांची उंची: 4.66 मीटर
२६ जुलै (शनिवार) – दुपारी 1:20 वाजता, लाटांची उंची: 4.67 मीटर (सर्वाधिक)
२७ जुलै (रविवार) – दुपारी 1:56 वाजता, लाटांची उंची: 4.60 मीटर
या दरम्यान समुद्र खवळलेला राहणार असल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांपासून लांब राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने खालील सूचना दिल्या आहेत.
भरतीच्या वेळेत समुद्रकिनारी जाणं पूर्णतः टाळा.
पोलीस किंवा प्रशासनाने दिलेल्या सूचना आणि मार्गदर्शनाचे काटेकोर पालन करा.
भरतीदरम्यान सेल्फी काढण्यासाठी समुद्रात जाण्याचा प्रयत्न अजिबात करू नका.
लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना भरतीच्या वेळेत समुद्रकिनारी फिरकू देऊ नका.
भरतीच्या वेळी लाटांचा जोर इतका अधिक असतो की, अचानक उंच लाटांमुळे अपघात होण्याचा धोका संभवतो. विशेषतः चौपाट्यांवर गर्दी करणाऱ्या पर्यटकांनी अत्यंत खबरदारी घ्यावी. पोलिस बंदोबस्तही या ठिकाणी वाढवण्यात आला असला तरी नागरिकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून सावध राहणं आवश्यक आहे.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत समुद्र आणखी खवळलेला राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पारंपरिक मच्छीमार संघटनांनी राज्य सरकारकडे पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. गुजरातमध्ये ही बंदी यशस्वी ठरल्यामुळे महाराष्ट्रातही अशा निर्णयाची शक्यता आहे.
सागराची शांतता कधीही वादळात बदलू शकते. मुंबईकर नागरिकांनी आणि पर्यटकांनी पुढील २४ ते २७ जुलै २०२५ या भरतीच्या काळात समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहणेच योग्य ठरेल. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आपण स्वतःची व आपल्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करू शकता.