
मुंबई: महाराष्ट्रावरच पावसाचं संकट दिवसेंदिवस गडद होत चालल्याचं दिसून आलं आहे. ‘राज्य सरकारने आपत्ती निवारणाची काही महत्त्वाची कामे तातडीने हाती घ्यावीत,’ अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सरकारला केली. त्यांनी पंचनामा प्रक्रिया करताना ठराविक मुदतीचे बंधन नसावे आणि पात्रतेचे निकष शिथिल करावेत अशा सूचना दिल्या आहेत.
शनिवारी रात्री मुंबईत पावसाची तीव्रता वाढली. या पावसाचा सर्वाधिक मोठा फटका दक्षिण मुंबईला बसला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी पश्चिम विदर्भाजवळ असल्याने महाराष्ट्रामध्ये त्यातही प्रामुख्याने कोकण विभागात याचा प्रभाव अधिक होता. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे चांगला पाऊस पडून गेला आहे.
यावेळी ऑरेंज अलर्ट हा महामुंबई परिसर, पालघर जिल्हा आणि रायगड जिल्ह्याला देण्यात आला आहे. मुंबईमध्ये शनिवारी सकाळी ८.३० ते रात्री ८.३०पर्यंत कुलाबा येथे ९.६, तर सांताक्रूझ येथे ११.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर रात्री विजांच्या कडकडाटासह वीज आणि पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला होता.
मुंबईसोबतच डहाणू, माथेरान येथेही शनिवारी आणि रविवारी पावसाचा जोर कायम होता. डहाणू येथे रविवारी सकाळी ८.३०पर्यंत १३१, जव्हार येथे ११४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर पालघर कृषी केंद्रावर १८४ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. रायगड जिल्ह्यात माणगाव येथे १०२, माथेरान येथे ८४.२ मिलीमीटर पाऊस रविवारी सकाळी ८.३०पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदला गेला.
मुंबईत पाण्याचं व्यवस्थापन करण्यात आल्याचं यावेळी दिसून आलं आहे. शनिवारपासून मुंबईत पाऊस कोसळत असून मुंबई महानगरपालिकेची मदत यंत्रणा यावेळी कार्यरत असल्याचं दिसून आलं आहे. पर्जन्य जलवाहिन्या, घनकचरा व्यवस्थापन कर्मचारी, अभियंते, पंप चालक, आपत्कालीन पथके इत्यादी कर्मचारी, कामगार वॉर्डस्तरावर कार्यरत होते, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.