मुंबईतील 5 नामांकित क्लब्सवर FDA ची कारवाई; FSSAI परवाने निलंबित

Published : Jul 29, 2026, 11:18 AM ISTUpdated : Jul 29, 2026, 11:21 AM IST
Food Safety

सार

मुंबईतील सात प्रमुख क्लब, कँटीन आणि रेस्टॉरंट्सवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छापेमारी केली. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने पाच क्लब्सचे FSSAI परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

मुंबई : मुंबईतील नामांकित क्लब्समधील अन्नसुरक्षेबाबत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) 27 जुलै रोजी ग्रेटर मुंबईतील सात क्लब, कँटीन आणि रेस्टॉरंट्सची तपासणी करण्यात आली. यावेळी स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि साठवणुकीतील गंभीर त्रुटी आढळल्या. या पार्श्वभूमीवर पाच प्रतिष्ठित क्लब्सचे FSSAI परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर एका क्लबला फूड बिझनेस तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

'या' क्लबांवर FDA ची मोठी कारवाई

तपासणीनंतर द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI), आर.के. जुहू जिमखाना, द अपर्णा जुहू जिमखाना, एमआयजी क्रिकेट क्लब (बांद्रा पूर्व) आणि द विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब या पाच क्लबांचे FSSAI परवाने निलंबित करण्यात आले. याशिवाय एका संस्थेला सुधारणा नोटीस बजावण्यात आली.

CCI क्लबमध्ये झुरळे, माशांचा प्रादुर्भाव

‘द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’ येथे तपासणीदरम्यान स्वयंपाकघर आणि फूड स्टोरेजच्या भागात जिवंत झुरळे व माशांचा प्रादुर्भाव आढळला. याशिवाय कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेल्या अन्नावर पाण्याचे थेंब पडत होते. खराब झालेल्या भाज्या तसेच एक्सपायरी डेटेड अन्नपदार्थ साठवून ठेवण्यात आल्याचे निरीक्षण करण्यात आले. अन्नपदार्थांवर आवश्यक लेबलिंग नसणे, FIFO आणि FEFO पद्धतींचे पालन न करणे, शाकाहारी आणि मांसाहारी अन्न तयार करण्यासाठी स्वतंत्र विभाग नसणे यामुळे अन्न दूषित होण्याचा धोका असल्याचे FDA ने नमूद केले.

जुहू जिमखान्यांमध्ये स्वच्छतेचे उल्लंघन

आर.के. जुहू जिमखानामध्ये भिंती आणि छतांची दुरवस्था, अस्वच्छ स्वयंपाकघर, अयोग्य ड्रेनेज व्यवस्था, चुकीच्या तापमानात फूड स्टोअर करणे आणि वापरलेल्या खाद्यतेलाच्या नोंदी नसल्याचे आढळले. तसेच कर्मचारी हातमोजे, कॅप आणि अॅप्रनचा वापर करत नसल्याने स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. ‘द अपर्णा जुहू’ जिमखानामध्ये गंजलेली स्वयंपाकाची उपकरणे, कीटकांच्या प्रवेशासाठी मोकळ्या जागा, कच्चे आणि शिजवलेले तसेच शाकाहारी-मांसाहारी अन्न वेगळे न ठेवणे, स्वच्छतेच्या प्रक्रियेतील त्रुटी आणि अनिवार्य ऑडिट न केल्याचे आढळून आले.

एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये परवान्याशिवाय केटरिंग सेवा

एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये 'एम/एस नेब्युला केटरिंग सर्व्हिसेस' ही थर्ट पार्टी संस्था वैध FSSAI परवान्याशिवाय खाद्य सेवा पुरवत असल्याचे तपासणीत समोर आले. याशिवाय कीटकांचा प्रादुर्भाव, अन्नसाठवणुकीतील त्रुटी, अन्न व पाण्याच्या चाचण्यांच्या नोंदींचा अभाव आढळून आला.

गोरेगाव स्पोर्ट्स क्लबला तात्काळ फूड ऑपरेशन बंद करण्याचे आदेश

मालाड पश्चिम येथील गोरेगाव स्पोर्ट्स क्लब वैध FSSAI परवाना किंवा नोंदणीशिवाय खाद्य व्यवसाय चालवत असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स (लायसेंसिंग अँड रजिस्ट्रेशन ऑफ फूड बिझनेस) रेग्युलेशन्स, 2011अंतर्गत या क्लबला तात्काळ खाद्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

विलिंग्डन स्पोर्ट्स क्लबमध्येही गंभीर त्रुटी

विलिंग्डन स्पोर्ट्स क्लबमध्ये अस्वच्छ ड्रेनेज, घाणेरडे मजले, खराब झालेले छत, अन्नसाठवणुकीच्या तापमानावर योग्य नियंत्रण नसणे, एक्सपायरी डेट फूड टेस्टिंग रेकॉर्ड आणि स्वच्छतेचे वेळापत्रक नसल्याचे FDA च्या तपासणीत आढळले.

सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी कारवाई

FDA ने स्पष्ट केले की, अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे तसेच नागरिकांना सुरक्षित अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित संस्थांनी आवश्यक सुधारणा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची मोठी घोषणा; मुंबई-कोकण मार्गावर या 5 विशेष रेल्वेगाड्या धावणार
'जंतरमंतर लाठीमारावर गृहमंत्र्यांनी संसदेत उत्तर द्यावे'; संजय राऊतांची केंद्र सरकारवर जोरदार टीका