
मुंबई : मुंबईतील एका महिला डॉक्टरने इस्लामपूरजवळ धावत्या गाडीतच आपलं जीवन संपवलं आहे. डॉ. शुभांगी समीर वानखेडे (वय 44) असं त्यांचं नाव असून, त्या मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील ईएसआयसी हॉस्पिटल क्वार्टर्समध्ये राहत होत्या. व्यावसायिक तणाव आणि निराशेमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाळवा तालुक्यातील विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत घडली. डॉ. शुभांगी यांनी आपल्या गाडीत (MH 03 AR 1896) ब्लेडने गळा आणि डाव्या हाताची नस कापून आत्महत्या केली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्या गाडीतच बेशुद्ध अवस्थेत आढळल्या.
मंगळवारी सकाळी डॉ. शुभांगी दवाखान्यात जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडल्या, मात्र त्या थेट कोल्हापूरच्या दिशेने निघाल्या होत्या. काही वेळानंतर त्यांच्या मोबाईलचा संपर्क तुटला. त्यांची गाडी विठ्ठलवाडी परिसरात उभी असलेली आढळली आणि गाडीच्या मागील बाजूस शुभांगी वानखेडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शुभांगी यांना इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता, त्यात त्यांचं ओळखपत्र आणि रक्ताचे डाग आढळून आले. डॉ. शुभांगी यांच्या पश्चात पती समीर वानखेडे (जे स्वतः डॉक्टर आहेत), एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळानंतर डॉ. शुभांगी व्यावसायिक तणावात होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्या निराश होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शुभांगी आणि त्यांचे पती समीर दोघेही डॉक्टर असल्याने त्यांना कोरोना काळात मोठा व्यावसायिक ताण सहन करावा लागला होता. याच तणाव आणि निराशेपोटी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
डॉ. शुभांगी यांनी गळ्याच्या नसा कापल्याने अतिरक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. रात्री ११ च्या सुमारास घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पावले उचलली. शवविच्छेदनानंतर डॉ. शुभांगी यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि वानखेडे कुटुंबात शोककळा पसरली आहे. आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.