
मुंबई : मुंबईच्या कांदिवली परिसरातून सिनेसृष्टीला हादरवणारी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका प्रसिद्ध गुजराती अभिनेत्रीच्या 14 वर्षीय मुलाने 57 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित अभिनेत्री आपल्या पती आणि एकुलत्या मुलासह कांदिवलीतील एका गगनचुंबी इमारतीत 57 व्या मजल्यावर राहते. आत्महत्या केलेला मुलगा तिचा एकमेव अपत्य होता.
घटनेच्या दिवशी अभिनेत्रीने आपल्या मुलास ट्यूशनला जाण्यास सांगितले होते. मात्र, त्याला ट्यूशनला जायचे नव्हते. या कारणावरून तो रागावला आणि त्याने थेट 57 व्या मजल्यावरून उडी मारून आपले प्राण गमावले, असे प्राथमिक अंदाज वर्तवले जात आहेत.या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी याची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांकडून अत्यंत गुप्ततेने कार्यवाही केली जात आहे.
अभिनेत्रीचे नाव किंवा मुलाचे तपशील अजूनही अधिकृतरित्या समोर आलेले नाहीत. मात्र, संबंधित अभिनेत्री गुजराती सिनेसृष्टीत कार्यरत असल्याची माहिती प्राथमिक तपासातून मिळत आहे.या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.