गणेशोत्सवापूर्वी BMC चे मोठे पाऊल; मूर्तींच्या मार्गांवरील खड्डे, स्पीड ब्रेकर हटवणार

Published : Aug 26, 2026, 11:20 AM IST
Lalbgh-Parel Ganpati

सार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जन मार्गांची पायी पाहणी सुरू केली आहे.

मुंबई : गणेशोत्सवाला आता अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. अशातच मुंबई महापालिकेने गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जन मार्गांच्या पाहणीला वेग दिला आहे. महापालिकेच्या रस्ते विभागातील इंजिनिअर्सला आपल्या विभागातील गणेशमूर्तींच्या प्रमुख मार्गांची पायी पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मार्गांवर रस्ते सपाट असावेत, खड्डेमुक्त आणि मोठ्या गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनांसाठी धोकादायक ठरतील असे स्पीड ब्रेकर नसावेत, याची तपासणी करण्यात येणार आहे.

भुलेश्वर दुर्घटनेनंतर महापालिका सतर्क

गणेशमूर्तींच्या मार्गांच्या पाहणीचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत. सर्व गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जन मार्गांची 24 तासांच्या आत पाहणी करण्याच्या सूचना त्यांनी महापालिकेला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर इंजिनिअर्सकडून महापालिकेच्या प्रत्येक विभागातील रस्ते पायी फिरून मार्गांची पाहणी करत आहेत. दहा दिवसांच्या गणेशोत्सवाच्या तयारीचा हा महत्त्वाचा भाग असल्याचे वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

22 फूट उंच गणेशमूर्ती कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू

भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर रस्त्यांच्या स्थितीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 22 फूट उंच गणेशमूर्ती मंडपाच्या ठिकाणी नेत असताना अचानक पुढे कोसळली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये पाच आणि सात वर्षांच्या दोन मुलांचाही समावेश आहे. ही दुर्घटना ज्या ठिकाणी घडली, त्या परिसरातील रस्त्यावर मोठा खड्डा आणि रस्त्याचा खचलेला भाग असल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला. मूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनाला रस्त्यावरील खड्डा किंवा उंच-सखल भागाचा धक्का लागल्याने वाहनाचा तोल गेला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

गणेशोत्सव मंडळांचीही महापालिकेकडे मागणी

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश डहिभावकर यांनी सांगितले की, भुलेश्वर दुर्घटनेनंतर महापालिकेकडून अद्याप कोणतेही विशेष अपडेट मिळालेले नाही. मात्र, मंडळांचे स्वयंसेवक विभागीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम करत आहेत. पालकमंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सव मंडळांच्या समस्या महापालिकेसमोर मांडल्याने तयारीला वेग येईल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी होणारी महापालिका आयुक्तांसोबतची बैठक अद्याप झालेली नसल्याने ती लवकर घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.

खड्डे बुजवण्याचे काम आधीपासून सुरू

महापालिकेच्या रस्ते विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीची विशेष मोहीम आधीपासूनच सुरू आहे. मागील आठवड्याच्या अखेरीसही अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. नव्या निर्देशांचा उद्देश सुरू असलेली कामे अधिक काळजीपूर्वक आणि वेगाने पूर्ण करून गणेशमूर्तींच्या मार्गांवरील अडथळे दूर करणे हा आहे.

24 ऑगस्टपर्यंत मुंबईतील खड्ड्यांची स्थिती

  • सोमवारी नोंद झालेल्या तक्रारी: 135
  • शनिवारपासून नोंद झालेल्या तक्रारी: 414
  • शनिवारपासून निकाली काढलेल्या तक्रारी: 338
  • एकूण प्रलंबित तक्रारी: 235

PREV
Read more Articles on

Recommended Stories

मुंबई कोस्टल रोडसाठी कायमस्वरूपी वाहतूक नियम लागू; वेगमर्यादा, प्रवेशबंदी आणि पार्किंगबाबत मोठे बदल
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या जुलै हप्त्याबाबत अपडेट, रक्षाबंधन आणखीच गोड होणार