मुंबई कोस्टल रोडसाठी कायमस्वरूपी वाहतूक नियम लागू; वेगमर्यादा, प्रवेशबंदी आणि पार्किंगबाबत मोठे बदल

Published : Aug 26, 2026, 09:44 AM IST
Costal Road

सार

मुंबई कोस्टल रोड आणि राजीव गांधी सागरी सेतूवरील तात्पुरते वाहतूक नियम रद्द करून कायमस्वरूपी नियम लागू करण्यात आले आहेत.

मुंबई : मुंबईच्या कोस्टल रोड आणि राजीव गांधी सागरी सेतूवरील वाहतुकीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गांवरील तात्पुरत्या वाहतूक अधिसूचना रद्द करून आता कायमस्वरूपी वाहतूक नियम लागू करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाच्या अपर पोलीस आयुक्त मोक्षदा पाटील यांनी 25 ऑगस्ट रोजी अंतिम अधिसूचनेवर स्वाक्षरी केली. त्यानुसार वेगमर्यादा, प्रवेश-निर्गमन मार्ग, वाहनांवरील निर्बंध आणि वाहन थांबवण्याचे नियम निश्चित करण्यात आले आहेत.

कोस्टल रोडवर वेगमर्यादा किती?

कोस्टल रोडच्या सरळ मार्गावर वाहनांचा कमाल वेग ताशी 80 किमी निश्चित करण्यात आला आहे. बोगद्यात ताशी 60 किमी, तर वळणाच्या आणि रस्ता एकत्र येणाऱ्या ठिकाणी ताशी 40 किमी वेगमर्यादा लागू असेल. वाहनचालकांनी या वेगमर्यादांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल.

24 तास वाहतूक सुरू राहणार

कोस्टल रोड आणि राजीव गांधी सागरी सेतूवरील मार्ग 24 तास वाहतुकीसाठी खुले राहतील. चारचाकी वाहनांसह बेस्ट बस, प्रवासी बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने आणि इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांना या मार्गावर प्रवेश असेल.

दुचाकी आणि अवजड वाहनांना प्रवेशबंदी

कोस्टल रोड आणि सी लिंकवर सर्व प्रकारच्या दुचाकी वाहनांना प्रवेश बंद असेल. सायकल, मोपेड, स्कूटर, साइडकार असलेल्या दुचाकी तसेच तीनचाकी वाहनांनाही प्रवेश मिळणार नाही. याशिवाय ट्रक, टेम्पो, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर आणि इतर अवजड मालवाहू वाहनांवरही बंदी असेल. प्राण्यांनी ओढल्या जाणाऱ्या गाड्या, बैलगाडी, घोडागाडी आणि हातगाड्यांनाही या मार्गावर प्रवेश करता येणार नाही. पादचाऱ्यांनाही कोस्टल रोडवर प्रवेशास मनाई असेल.

वाहन थांबवून फोटो काढल्यास कारवाई

BEST बसला प्रवाशांची ने-आण करण्यासाठी प्रवेश देण्यात आला आहे. मात्र, बेस्ट बस वगळता इतर वाहनांना प्रवासी चढवण्यासाठी किंवा उतरवण्यासाठी कोस्टल रोडवर थांबता येणार नाही. तसेच वाहन रस्त्यावर थांबवून फोटो किंवा व्हिडीओ शूटिंग करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

दक्षिण दिशेकडील प्रवेश आणि एक्झिट मार्ग

दक्षिण दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी वांद्रे टोल प्लाझा, जे. के. कपूर सर्कल अंडरपास, स्व. बिंदू माधव ठाकरे जंक्शन, बॅरिस्टर रजनी पटेल जंक्शन (लोटस जंक्शन), वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली जंक्शन) आणि अमरसन्स गार्डन हे प्रवेशमार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

दक्षिण दिशेने बाहेर पडण्यासाठी वरळी सी लिंक गेट, बॅरिस्टर रजनी पटेल जंक्शन, वत्सलाबाई देसाई जंक्शन, अमरसन्स गार्डन आणि मरीन ड्राइव्ह (प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज) हे मार्ग असतील.

उत्तर दिशेसाठीही मार्ग निश्चित

उत्तर दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी मरीन ड्राइव्ह, अमरसन्स गार्डन, वत्सलाबाई देसाई जंक्शन, बॅरिस्टर रजनी पटेल जंक्शन, स्व. बिंदू माधव ठाकरे जंक्शन आणि जे. के. कपूर सर्कल अंडरपास हे प्रवेशमार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

उत्तर दिशेने बाहेर पडण्यासाठी अमरसन्स गार्डन, वत्सलाबाई देसाई जंक्शन, बॅरिस्टर रजनी पटेल जंक्शन, स्व. बिंदू माधव ठाकरे जंक्शन, वरळी सी लिंक गेट आणि वांद्रे टोल प्लाझा हे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Greenery : परदेशी नागरिकाला मुंबईची भुरळ, शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांचं केलं कौतुक
Tukaram Mundhe : शाळेत वडापाव पुन्हा सुरू करा! चिमुकल्याच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं भन्नाट उत्तर