लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ मध्यरात्री भीषण दुर्घटना, दोन चिमुकल्यांना गाडीने चिरडले; एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी

Published : Sep 06, 2025, 12:48 PM IST
death

सार

लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. यावेळी अज्ञात वाहनाने रस्त्यावर झोपलेल्या दोन जणांना चिरडले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे.

मुंबई : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज (शनिवार) राज्यभरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. सकाळपासूनच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झाली. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि "गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले. या उत्साहाच्या दरम्यान लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दुर्दैवी घटना घडली. लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध मार्गावर अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले. या अपघातात दोन वर्षांची चंद्रा वजणदार हिचा मृत्यू झाला, तर तिचा भाऊ ११ वर्षीय शैलू वजणदार गंभीर जखमी झाला. सध्या त्याच्यावर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकी कशी घडली घटना?

शनिवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दोन्ही मुले रस्त्याच्या कडेला झोपलेली असताना अज्ञात व्यक्तीने गाडी त्यांच्या अंगावर घातली. दुर्दैवाने, अपघात घडल्यानंतर चालकाने कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध कलम 106, 125(इ), 281, 184, 187 (भारतीय न्याय संहिता 2023) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

विसर्जनाचा जल्लोष कायम

दुर्घटनेनंतरही शनिवारी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे. लालबाग मार्केट आणि चिंचपोकळी स्टेशन (पश्चिम) परिसरात उड्डाणपुलाखाली भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. याशिवाय भायखळ्यातील हिंदुस्तान मशिद येथे दरवर्षीप्रमाणे मशिदीच्या समिती सदस्यांकडून मूर्तीचे स्वागत करण्यात येते. यानंतर अखेर गिरगाव चौपाटीवर बाप्पाचे विसर्जन केले जाते. 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Thane Metro : ठाणेकरांनो, तुमची प्रतीक्षा संपली! मेट्रो-4 डिसेंबरमध्ये सुरू होणार
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!