Mumbai Traffic Advisory : मुंबईत आज गणेश विसर्जनाचा जल्लोष; वाहतूक पोलिसांकडून मार्गांमध्ये बदल, घ्या जाणून

Published : Sep 06, 2025, 10:46 AM IST
Mumbai Ganpati

सार

मुंबईत आज गणेश विसर्जनाची मोठी धूम पहायला मिळणार आहे. अनेक गणपती बाप्पांना आज निरोप दिला जाणार आहे. अशातच वाहतूकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. 

मुंबई : मुंबईत दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज, ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून लाखो भाविक या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कोणते रस्ते राहणार बंद?

६ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपासून ते ७ सप्टेंबर पहाटे ६ वाजेपर्यंत मुंबईतील अनेक प्रमुख रस्ते बंद राहतील.

  • कुलाबा विभाग : नथालाल पारेख मार्ग (भाई बंदरकर चौक ते सय्यद मोहम्मद जमादार चौक), कॅ. प्रकाश पेठे मार्ग (संत गाडगे महाराज चौक ते झुलेलाल मंदिर चौक).
  • मरीन ड्राईव्ह विभाग : नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग (गरजेनुसार वाहतूक वळवली जाईल).
  • आझाद मैदान विभाग : महापालिका मार्ग (सीएसएमटी जंक्शन ते मेट्रो जंक्शन).
  • काळबादेवी विभाग : जे. एस. एस. रोड (अब्दुल करीम खान चौक ते समतानंद गद्रे चौक), विठ्ठलभाई पटेल मार्ग (कस्तुरबा गांधी चौक ते भगवान श्री चंद्रप्रभा चौक), बाबा साहेब जयकर मार्ग (घोडागाडी जंक्शन ते खत्तर गल्ली नाका), राजा राम मोहन रॉय रोड (चारुशीला गुप्ते चौक ते प्रार्थना समाज जंक्शन).

पर्यायी मार्गांची व्यवस्था

  • कुलाबा विभागातील बंद रस्त्यांवरील वाहतूक कॅ. प्रकाश पेठे मार्ग, साधु टी.एल. वासवानी मार्ग, वर्ल्ड ट्रेड सेंटर, मेकर टॉवर आणि जी.डी. सोमानी मार्गे वळवण्यात येईल.
  • आझाद मैदान विभागातील महापालिका मार्गावरील वाहतूक डी.एन. रोड आणि एल.टी. मार्गे मेट्रो जंक्शनकडे वळवली जाईल.
  • तर काळबादेवी विभागातील वाहतूक महर्षी कर्वे रोड, काळबादेवी रोड आणि एन.एस. रोड मार्गे वळवण्यात येणार आहे.

अवजड वाहनांना प्रवेशबंदी

६ सप्टेंबर सकाळी ७ वाजल्यापासून ते ७ सप्टेंबर मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण बृहन्मुंबई परिसरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल. यामुळे विसर्जन मिरवणुकीत होणारी गर्दी आणि वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. उत्तर ते दक्षिण मुंबई किंवा दक्षिण ते उत्तर मुंबई जाणाऱ्यांनी कोस्टल रोड (धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग) वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भाविकांसाठी सुविधा

नागरिकांची सोय व्हावी म्हणून तीनही मार्गांवरील लोकल ट्रेन रात्रभर सुरू ठेवण्यात येणार आहेत. विसर्जनासाठी प्रमुख ठिकाणे म्हणजे गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टी-जंक्शन आणि पवई गणेश घाट अशी निश्चित करण्यात आली आहेत. मुंबई पोलिसांच्या या नियोजनामुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे. भाविकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

 

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mega Block : मध्य रेल्वेचा चार दिवसांचा रात्रीचा ब्लॉक; 12 गाड्यांच्या वेळेत बदल, कधी आणि कुठे जाणून घ्या!
पश्चिम रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय! 15 डब्यांची लोकल 'या' स्टेशनपर्यंत धावणार! प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा