
MHADA Lottery 2026 : दरवर्षी म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता (BMC Election 2026) संपल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुमारे तीन हजार घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लॉटरी मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असून, परवडणाऱ्या दरात स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईत प्रत्येक इंच जागेला सोन्याचा भाव असताना, सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची संधी म्हणजे म्हाडाची लॉटरी. गेल्या काही वर्षांत म्हाडाने मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी बाजारभावापेक्षा खूप कमी किमतीत घरे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे म्हाडाच्या घरांना नेहमीच प्रचंड प्रतिसाद मिळतो. मार्च महिन्यात काढली जाणारी ही लॉटरी मुंबईकरांसाठी मोठी संधी ठरणार आहे. मात्र, या लॉटरीत मुंबईतील नेमक्या कोणत्या भागातील घरे असतील, याची माहिती अद्याप जाहीर झालेली नाही.
मुंबई मंडळासोबतच म्हाडाच्या कोकण मंडळाकडूनही सुमारे चार हजार घरांची लॉटरी काढण्याची तयारी करण्यात आली आहे. कोकण मंडळाच्या घरांना मागील लॉटरीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. काही ठिकाणी पायाभूत सुविधा अपूर्ण असल्यामुळे नाराजी व्यक्त झाली होती, मात्र प्राधिकरणाने रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधांवर भर दिल्याने आगामी लॉटरीत या घरांना अधिक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
म्हाडाने गेल्या 76 वर्षांत राज्यभरात सर्वसामान्यांसाठी सुमारे 9 लाख परवडणारी घरे उभारली आहेत. बीडीडी चाळ पुनर्विकास, मोतीलाल नगर, जीटीबी नगरमधील पंजाबी कॉलनी, पत्राचाळ, अभ्युदय नगर, पूनम नगर आणि अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर यांसारखे अनेक महत्त्वाचे प्रकल्प सध्या नियोजनाच्या टप्प्यात आहेत. या प्रकल्पांमुळे भविष्यात मुंबईतील गृहनिर्माण समस्या काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांना नेहमीच सर्वाधिक मागणी असते. कमी किमतीत, सुरक्षित आणि अधिकृत घर मिळत असल्याने मध्यमवर्गीय आणि निम्न उत्पन्न गटासाठी ही लॉटरी मोठा आधार ठरते. येत्या मार्चमध्ये जाहीर होणारी लॉटरी मुंबईकरांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारी ठरू शकते.