
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक अनपेक्षित पण अतिशय महत्त्वाची भेट दिली. या सरप्राईज भेटीनं केवळ ठाकरे कुटुंबीयांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातही नवीन चर्चा सुरु झाल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ दूर गेलेले ठाकरे बंधू पुन्हा एकदा एका छताखाली आलेत, तेही मातोश्रीवर.
राज ठाकरे यांनी गुलाबफुलांचा गुच्छ देत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघांनी गळाभेट घेतली. मग दोघेही थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत गेले आणि त्यांच्या आसनासमोर नतमस्तक झाले. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देताना बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांवरही गप्पा रंगल्या. या २० मिनिटांच्या भेटीत भावनिक आणि स्नेहपूर्ण क्षणांची बरसात झाली.
या भेटीबद्दल कोणालाही कल्पना नव्हती. सकाळीच राज ठाकरे यांनी ठरवलं की, आपण मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात. यानंतर त्यांनी बाळा नांदगावकर यांच्या फोनवरून संजय राऊत यांना संपर्क साधला, आणि भेटीची माहिती दिली. संजय राऊत यांनी लगेचच उद्धव ठाकरे यांना याबद्दल कळवले. काही वेळातच राज ठाकरे दादर येथील ‘शिवतीर्थ’ या त्यांच्या निवासस्थानावरून निघाले आणि थेट मातोश्रीवर पोहोचले.
ही अचानक झालेली आणि अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडलेली भेट अनेक राजकीय चर्चांना उधाण देत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यात पुन्हा युती होणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेही या घटनेमुळे उत्साहित झाले आहेत.
उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरे यांना सोडण्यासाठी बाहेर आले आणि राज ठाकरे यांनीही सर्वांना हात हलवून अभिवादन करत शांतपणे निघून गेले. दोघांची ही मैत्रीची झलक पाहून अनेक शिवसैनिक आणि मनसैनिक भावुक झाले.
‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून या भेटीचे बारकाईने वर्णन करण्यात आले आहे. त्यामध्ये बाळासाहेबांच्या खोलीत घडलेले क्षण, गप्पांचे विषय आणि दोघांमधील उबदार संवाद यावर भर देण्यात आला आहे.
“ही भेट केवळ वाढदिवसापुरती मर्यादित न राहता, भविष्यातील युतीची पायाभरणी ठरेल,” अशी जनमानसात आशा आहे. दोन्ही नेत्यांची व्यक्तिमत्त्वे, विचारधारा आणि नेतृत्वगुण पाहता, जर एकत्र आले तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. परंतु, ही पालवी टिकून राहते का, की पुन्हा एकदा कोमेजते, हे येणारा काळच ठरवेल.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील ही स्नेहमिलनाची भेट राजकारणातील केवळ औपचारिकता नव्हे, तर एका नव्या अध्यायाची नांदी ठरू शकते. बाळासाहेबांच्या वारशाला एकत्रित पुढे नेण्याचा संधीचा हा क्षण आहे. आता यावर राजकारण होईल की युती, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.