
मुंबईकरांच्या मेट्रो प्रवासाला आणखी एक नवा आयाम मिळाला आहे. अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (T2) यामध्ये मेट्रो मार्ग 7A च्या बोगद्याचं काम महत्त्वाच्या टप्प्यावर आलं आहे. नुकताच या बोगद्याचा ब्रेकथ्रू यशस्वीपणे पूर्ण झाला असून, या ऐतिहासिक क्षणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून साक्ष दिली.
या विशेष प्रसंगी मुख्यमंत्र्यांसोबत गृहनिर्माण मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार पराग आळवणी आणि अनेक वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. फडणवीस यांनी कामाची पाहणी केली, प्रगतीचा आढावा घेतला आणि काम करणाऱ्या इंजिनियर व कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले.
30 मीटर खोल जमिनीतून यशस्वी बोगदा TBM (टनेल बोअरिंग मशीन) सप्टेंबर 2023 मध्ये जमिनीखालून ३० मीटर खाली सुरू करण्यात आले. सहारच्या उन्नत रस्त्याखालून, जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्यांच्या अडथळ्यांवर मात करत, अखेर बोगद्याचे कार्य यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. ही एक मोठी तांत्रिक कामगिरी मानली जाते.
कनेक्टिव्हिटीचा महत्त्वाचा टप्पा हा 1.65 किमीचा भूमिगत बोगदा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानक ते एअरपोर्ट कॉलनी स्थानकादरम्यान आहे. हा मार्ग केवळ अंधेरीच नाही, तर पुढे मीरा-भाईंदर आणि वसई-विरारपर्यंत विमानतळाशी मेट्रोने थेट जोडणी साधणारा आहे. सध्या 7A मेट्रो मार्गाचं ५९% काम पूर्ण झालं आहे.
या प्रकल्पाचे खास फायदे :
✅ मेट्रो मार्ग 3 शी थेट जोडणी – म्हणजे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्ग आणि विमानतळ यांची सुलभ कनेक्टिव्हिटी
✅ प्रवास होणार अधिक आरामदायी, जलद व सुरक्षित
✅ मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे उत्तम उदाहरण
✅ विमानतळ परिसरातील जागेचा कमीत कमी वापर
या कामामुळे केवळ मेट्रोच्या प्रवासात गती येणार नाही, तर मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचं चित्रही बदलणार आहे. येत्या काही वर्षांत मुंबईचं मेट्रो नेटवर्क आणखी भक्कम होणार हे नक्की!