
मुंबई: घाटकोपर पूर्वेकडील एका नामांकित सोसायटीत मराठी कुटुंबावर करण्यात आलेल्या अमराठी अपमानाने परिसर ढवळून निघाला आहे. एका गुजराती व्यक्तीकडून एका मराठी कुटुंबाच्या खाद्यसंस्कृतीचा आणि जातीचा अवमान करत, "तुम मराठी लोग गंदा है, मच्छी मटण खाता है" असे वाक्य उच्चारले गेल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकाराने मराठी जनतेच्या भावना दुखावल्या असून, संपूर्ण घाटकोपर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
घटनेची माहिती मिळताच मनसेचे घाटकोपर विभाग प्रमुख राज पार्टे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबंधित सोसायटीच्या अमराठी सदस्यांना जाब विचारत ठणकावले. "इथे जरी चार मराठी कुटुंब राहतात, तरी त्यांच्यावर अन्याय झाला तर चार हजार मराठी माणसं त्यांच्या पाठीशी उभी राहतील!" मनसेचा हा ठाम इशारा संपूर्ण सोसायटीला आणि परिसरातील लोकांना चांगलाच जाणवला. या क्षणापासून, या वादाला केवळ मांसाहार किंवा जातीपातीचा विषय न राहता, मराठी अस्मिता आणि प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे.
या प्रकरणात मूळ मुद्दा मांसाहार आहे का? की एक विशिष्ट समाजाविषयी असलेला पूर्वग्रह आणि वर्चस्वाची मानसिकता? सवाल असा आहे की – खाण्यापिण्याच्या सवयीवरून एका पूर्ण समाजाला ‘गंदा’ ठरवणं योग्य आहे का? मराठी समाजाने नेहमीच सहिष्णुता आणि स्वीकारशीलतेचा आदर्श ठेवला आहे. पण आता वारंवार होत असलेल्या अपमानासमोर मराठी माणूस शांत बसणार नाही, हे स्पष्ट होत आहे.
गेल्या काही दिवसांत मनसेने बँकांमध्ये मराठी भाषा वापरण्याची मोहीम सुरू केली आहे. अनेक बँकांमध्ये मराठीतून व्यवहार होतो की नाही, हे तपासून व्यवस्थापनाला निवेदने दिली जात आहेत. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना दम भरला गेला, तर काही ठिकाणी सकारात्मक बदलही घडवून आणले गेले आहेत.