
Mumbai: मुंबईत ट्रेनला काही मिनिट जरी उशीर झाला तरी प्रवाशांचा गोंधळ उडत असतो. येथील गर्दीत प्रवास करताना प्रत्येकाला धक्काबुक्की सहन करावी लागते. ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी, २९ जूनला मेगाब्लॉक घोषित केला. रविवारच्या दिवशी मेगाब्लॉक जाहीर केल्यामुळं प्रवाशांची तारांबळ होणार आहे. रेल्वेच्या मार्गावर ब्लॉक टाकल्यावर रेल्वे रूळ आणि सिंग्नलची दुरुस्ती करण्याचं काम केलं जाणार आहे.
वसई रोड ते वैतरणादरम्यान शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात आल्याने रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. या वेळेमध्ये काही ठिकाणच्या रेल्वे गाड्या कॅन्सल होणार असून काही उशिराने धावणार असल्याची माहिती देण्यात आली. रेल्वे मार्गावर मेंटेनंस काढून वेळेवर काम केल्यामुळं पावसाळ्यात अडचण निर्माण होत नाही.
ब्लॉक वेळेत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या बदलांमुळे काही मार्गावरील रेल्वे उशिराने धावणार असून काही लोकल्स या २० मिनिटे उशिराने धावतील असं सांगण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूरदरम्यान, ठाणे ते पनवेलदरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावणार आहेत. हार्बर मार्गावरील लोकल गाड्या उशिराने येतील असं सांगण्यात आलं आहे.