
मुंबई : महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट भूमिका घेत "हिंदीची सक्ती होऊ देणार नाही" असा स्पष्ट इशारा दिला आहे. या विरोधात ५ जुलै रोजी मुंबईत मोठा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात सर्व मराठी भाषाप्रेमींनी सहभागी व्हावे, असा संदेश देताना मनसेने शिवसेना (उद्धव ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांना विशेष निमंत्रण दिले आहे. यापूर्वी हा मोर्चा ६ जुलैला काढण्यात येणार होता. परंतु, आता तो ५ जुलैला काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, या मोर्चाच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना फोन करुन या मोर्चात सहभागी होण्याची निमंत्रण दिले आहे. तसेच या मोर्चात कोणताही झेंडा राहणार नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे अनेक नेते या मोर्चात सहभागी होतील असे दिसून येत आहे. या निमित्ताने दोन्ही ठाकरेंची मनोमिलन झाल्याचे दिसून येईल असे सांगितले जात आहे.
मनसेकडून संजय राऊत यांना फोन करून "पक्षीय मतभेद विसरून, मराठी भाषेसाठी एकत्र यावे" असे सांगण्यात आले. राज ठाकरे यांनी देखील सूचक विधान करत "मराठी माणसांच्या हितासाठी आम्ही आमच्यातले किरकोळ वाद संपवायला तयार आहोत" असे जाहीर केल्याने, उद्धव ठाकरे गटाशी युतीची शक्यता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे आवाहन
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने ५ जुलै रोजीच मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात कोणताही राजकीय रंग न देता, केवळ मराठी भाषेसाठी हा लढा असल्याचे स्पष्ट केले. "आमच्यातील कोणतेही वाद किंवा भांडण महाराष्ट्रापेक्षा मोठे नाहीत," असे राज यांनी ठामपणे सांगितले.
संजय राऊत यांची उपस्थिती ठरणार निर्णायक?
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या मोर्चात सहभागी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर ते सहभागी झाले, तर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील राजकीय दुरावा कमी होण्याची शक्यता आहे.
एकाच मुद्द्यावर दोन मोर्चे?
हिंदी सक्तीविरोधात मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार यांनीही आंदोलनाची हाक दिली असून, त्याला उद्धव ठाकरे यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे. ते आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, मनसेच्या मोर्चामुळे ठाकरे गट आपल्या आंदोलनाचा मार्ग बदलणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
राज ठाकरे यांनी "५ तारखेला माझ्या वाक्याचा अर्थ समजेल" असे सूचकपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेना-मनसे एकत्र येणार का? यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अनेक जाणकारांच्या मते, शिवसेनेचा मोर्चा रद्द होऊन मनसेच्या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात घेतलेली भूमिका ही केवळ भाषेचा प्रश्न नसून, महाराष्ट्रीय अस्मितेचा आणि मराठी जनतेच्या स्वाभिमानाचा मुद्दा आहे. या मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार का, याची दिशा ५ जुलैला स्पष्ट होईल.
मराठी भाषेच्या सन्मानासाठी सुरू झालेला हा लढा महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वळण देणारा ठरू शकतो.