
मुंबई : मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई उपनगरं, नवी मुंबई, पालघर, ठाणे, रायगडमध्ये मागील दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस कोसळतो आहे. काल शनिवारी सकाळपासून पावसाच्या जोरदार बॅटिंगने मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. आज रविवारीही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून ५ जुलै रोजी मुंबईसह उपनगरांतही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर आहे. पुणे, सातारा, घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसासह रेड अलर्ट आहे. तर रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे धुळे, नाशिक, विदर्भातील काही जिल्ह्यात यलो अलर्ट असून वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा - गिरीश महाजन
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी नागरिकांना सतर्कतेचा, सुरक्षिततेचा इशारा दिला आहे. पर्यटकांनी कोणत्याही प्रकारचा अतिरेक करू नये अशा सूचना दिल्या आहेत. मुसळधार पावसात मुंबईत प्रशासन अलर्ट मोडवर असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
दरम्यान, काल शनिवारी वसई-विरारमध्ये दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहराला पावसाने झोडपून काढलं. अनेक भागात पाणी साचलं असून रस्ते जलमय झाले आहेत. २४ तासात १२५ मिमी पाऊस झाला. पावसाचा वाहतूक सेवेवरही परिणाम झाला. वसई, विरार, नालासोपाऱ्यातील अनेक घरं, दुकानं पाण्याखाली गेली आहेत. अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. मधुमन परिसरात रस्त्यावर साचलेल्या पाण्यात वाहनंदेखील वाहून जात होती.