
मुंबई : गेटवे ऑफ इंडिया परिसरात गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना टळली. समुद्रात प्रवासी फेरी बोटीचे इंजिन अचानक बंद पडल्याने बोट समुद्रातच अडकली. या बोटीत 34 प्रवासी आणि चार कर्मचारी असे एकूण 38 जण होते. पोलिस आणि स्थानिक बोट ऑपरेटरच्या तत्परतेमुळे सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
गुरुवारी रात्री सुमारे 8.30 वाजता ‘अनवारी’ ही फेरी बोट समुद्रातील अर्ध्या तासाच्या सहलीनंतर गेटवे ऑफ इंडियाकडे परतत होती. त्यावेळी किनाऱ्यापासून सुमारे 1.5 नॉटिकल मैल अंतरावर बोटीचे इंजिन अचानक बंद पडले. त्यामुळे बोट समुद्रातच अडकली.
घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळताच कॉन्स्टेबल अभिजित शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील इतर बोटींबाबत माहिती घेतली. त्यावेळी ‘अनवारी’च्या जवळच ‘आझाद हिंद’ ही आणखी एक प्रवासी बोट असल्याचे समोर आले. पोलिसांनी ‘आझाद हिंद’चे मालक जुनैद मुल्ला यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. त्यानंतर ‘आझाद हिंद’ घटनास्थळी पोहोचली.
‘आझाद हिंद’ने समुद्रात अडकलेल्या ‘अनवारी’ला सुरक्षितपणे टो करून गेटवे ऑफ इंडियाच्या जेट्टी क्रमांक 2 पर्यंत आणले. रात्री सुमारे 9.30 वाजता बोट सुरक्षितपणे जेट्टीवर पोहोचली. या घटनेत बोटीवरील सर्व 34 प्रवासी आणि चार कर्मचारी सुखरूप किनाऱ्यावर उतरले. कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.