
मुंबई : मुंबईतलं जुहू म्हणजे सर्वात महागड्या आणि आलिशान परिसरांपैकी एक. याच जुहूमधल्या एका कोट्यवधी रुपयांच्या फ्लॅटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. फिरोज मोमीन नावाच्या एका रिअल इस्टेट सल्लागाराने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या बीच-फ्रंट घराची किंमत तब्बल 80 कोटी रुपये आहे. जुहू तारा रोडवर अरबी समुद्राला लागून असलेल्या या प्रॉपर्टीमधून तुम्ही थेट बीचवर जाऊ शकता.
या फ्लॅटची किंमत 80 कोटी रुपये असून त्याचं क्षेत्रफळ 5,600 चौरस फूट आहे. यात 5 बेडरूम, 4 गाड्यांसाठी पार्किंग स्लॉट आणि जवळपास 400 चौरस फुटांची एक मोठी खासगी बाल्कनी आहे. याशिवाय, स्विमिंग पूल, जिम, बँक्वेट हॉल, जॉगिंग ट्रॅक, सुंदर बाग आणि थेट बीचवर जाण्याची सोय अशा अनेक सुविधा इथे आहेत.
ही एक 'बेअर-शेल' अपार्टमेंट आहे, म्हणजेच खरेदीदार आपल्या आवडीनुसार आणि सोयीनुसार घराचं इंटिरियर डिझाइन करू शकतो. 80 कोटींच्या या फ्लॅटच्या व्हिडिओखाली नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
एका युजरने विचारलं, 'याचा EMI फेडायला तीन जन्म लागतील का?' तर दुसरा म्हणाला, 'सोमवारी पगार झाल्यावर येतो घ्यायला.' 'डाऊन पेमेंट किती आहे?' असाही प्रश्न काहींनी विचारला. एकाने तर गंमतीत लिहिलं, 'माझ्याकडे फक्त 20 रुपये कमी आहेत, नाहीतर मी हे घर नक्की घेतलं असतं.' एकंदरीत, या 80 कोटींच्या फ्लॅटने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे, यात शंका नाही.