
मुंबईच्या मध्यवर्ती भागात, भुलेश्वरमध्ये एका व्यक्तीला बनावट पोलिस असल्याचे भासवून ५० लाख रुपयांना लुटल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना मुंबई पोलिसांनी अवघ्या सहा तासांत पुणे, सातारा आणि ठाणे येथून अटक केली.
शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास, तक्रारदार पोपलवाडी परिसरातून जात असताना चार जणांनी त्याला अडवले. “पोलिस आहोत” अशी बतावणी करत त्यांनी त्याचे अपहरण केले. गाडीत जबरदस्तीने बसवून त्याला चाकू दाखवून धमकावले आणि "मुंबईत दिसलास तर फेक एन्काऊंटर करुन टाकू" अशी गंभीर धमकी दिली. त्यानंतर त्याच्याकडून ५० लाखांची बॅग हिसकावली आणि सिम कार्ड काढून खारघर परिसरात सोडून दिले.
तक्रारदाराने धाडस करून मुंबईत परत येत लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे लवकरच आरोपींचा शोध घेतला. साताऱ्यातील अजय लोखंडे, रेवणसिद्ध जावडे, सागर जाधव, विकास देहाळे आणि ठाण्याचा दिलीप ढेकळे यांना अटक झाली. तपासात वापरलेली गाडी, ३९ लाख रुपये रोख आणि चाकू हस्तगत करण्यात आले.
सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बनावट पोलिसांची ही थरकाप उडवणारी टोळी पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले असून, पुढील तपास सुरु आहे.