
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबई पोलिसांसाठी अनेक तंत्रज्ञान-आधारित प्रकल्पांचे उद्घाटन केले. यात मुंबईकरांसाठी "मुंबई पोलीस सिटिझन ॲप"चाही समावेश आहे. याशिवाय पोलीस कर्मचाऱ्यांना डिजिटल ओळखपत्रेही दिली जाणार आहेत. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले. "२०१७ मध्ये अनेक प्रकल्प सुरू झाले होते पण नंतर ते थांबले; मात्र २०२२ मध्ये गृहमंत्री (देवेंद्र फडणवीस) यांनी ते पुन्हा सुरू केले. आता मुंबई पोलिसांच्या प्रत्येक कारवाईत उत्तरदायित्व आणि जबाबदारी असेल आणि सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडतील.
आधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रे हाताळण्यासाठी मुंबई पोलीस पूर्णपणे सज्ज आहेत. प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला एक टॅबलेट दिला जाईल, ज्यामुळे त्यांना तपासाची सर्व माहिती आणि वेब पोर्टल्सचा ऑनलाइन ॲक्सेस मिळेल. साधारण ५०,००० टॅबलेट्स वाटले जात आहेत," असं भारती म्हणाले. या उपक्रमाचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले, "तंत्रज्ञान कधीच भेदभाव करत नाही." सिटिझन ॲप ही एक उत्तम संकल्पना असल्याचे सांगून ते म्हणाले की, राज्य आता हळूहळू डिजिटल पोलिसिंगकडे वाटचाल करत आहे आणि यात टॅबलेट्स महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यांनी 'MPIS'ला एक उत्तम प्लॅटफॉर्म म्हटले आणि 'ANC व्हॅन' नशामुक्त भारतासाठी खूप महत्त्वाची असल्याचे सांगितले. "सिटिझन ॲप युजर्सला ते कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतात हे ओळखण्यास मदत करेल. डिजिटल पोलिसिंगकडे आपण वळत असून यात टॅबलेट्सचा मोठा वाटा असेल. MPIS (मुंबई पोलीस इन्फॉर्मेशन सिस्टिम) ॲप एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. याशिवाय, 'ANC (अँटी-नार्कोटिक्स सेल) व्हॅन' नशामुक्त भारतासाठी आवश्यक आहे, कारण ती अमली पदार्थांविरुद्धचा लढा मजबूत करते," असं फडणवीस म्हणाले.