
भारतात लग्न म्हणजे मोठा थाटमाट, आलिशान हॉल आणि शेकडो पाहुण्यांची गर्दी असं समीकरण असतं. पण, मुंबईतल्या एका जोडप्याने मात्र एक वेगळाच मार्ग निवडला. क्रिशा कोठारी आणि वरील शाह यांनी केवळ आठ पाहुण्यांच्या साक्षीने लग्नगाठ बांधली आणि आपला हा खास दिवस अगदी खाजगी ठेवला.
या जोडप्याने मुंबईतल्या आपल्या घरच्या गच्चीवर हा विवाहसोहळा पार पाडला. इथून अरबी समुद्राचा सुंदर नजारा दिसतो. समुद्राची पार्श्वभूमी आणि शहराचं विहंगम दृश्य यामुळे मोठ्या लग्नाचा घाट न घालताही त्यांनी एक संस्मरणीय क्षण तयार केला.
'खुश वेडिंग' (Khush Wedding) या वेडिंग प्लॅनिंगच्या इन्स्टाग्राम पेजने त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले. सोशल मीडियावर युजर्सचं लक्ष या फोटोंनी लगेच वेधून घेतलं. स्वतःच्या अटींवर आणि अगदी साधेपणाने लग्न करण्याच्या या जोडप्याच्या निर्णयाचं अनेकजण कौतुक करत आहेत.
पाहुण्यांची यादी छोटी असली, तरी या लग्नाचा थाट आणि सजावट कुठेही कमी नव्हती. क्रिशाने लाल आणि सोनेरी रंगाची सब्यसाची साडी नेसली होती, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर, वरीलने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली पांढऱ्या आणि सोनेरी रंगाची शेरवानी घातली होती.
पांढऱ्या फुलांची सजावट आणि मेणबत्त्या लावून गच्चीचं रूपांतर एका सुंदर वेडिंग सेटपमध्ये करण्यात आलं होतं. सूर्यास्ताच्या वेळी तिथला उबदार प्रकाश आणि समुद्राचा नजारा या सगळ्यामुळे लग्नाचं वातावरण अधिकच रोमँटिक झालं होतं.
लग्नाच्या या फोटोंमध्ये अनेक भावुक क्षण टिपले गेले आहेत. अरबी समुद्राच्या साक्षीने एकमेकांना वचन देतानाचं हे जोडपं खूप छान दिसत आहे. एका खास फोटोमध्ये त्यांचे आठ पाहुणे त्यांच्या आजूबाजूला उभे राहून, टाळ्या वाजवून त्यांच्या नव्या आयुष्याचं स्वागत करताना दिसत आहेत.
चांगल्या प्लॅनिंगने आणि फक्त जवळच्या माणसांच्या उपस्थितीतही लग्न किती अविस्मरणीय होऊ शकतं, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.
लग्नाचे फोटो शेअर करताना 'खुश वेडिंग'ने या सोहळ्यातील साधेपणावर भर दिला. या लग्नात मोठेपणापेक्षा भावनांना जास्त महत्त्व दिलं गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे. क्रिशा आणि वरील यांनी 'बिग फॅट इंडियन वेडिंग'ची व्याख्या कशी बदलली, हेही या पेजने आवर्जून सांगितलं.
सोशल मीडिया युजर्सना या जोडप्याचे फोटो खूप आवडले आहेत. फक्त आपल्या जवळच्या माणसांसोबत हा दिवस साजरा करण्याच्या त्यांच्या निर्णयाला नेटकऱ्यांची दाद मिळत आहे.
अनेक युजर्सचं म्हणणं आहे की, अशा प्रकारच्या खाजगी लग्नांमुळे जोडप्यांना नातेवाईक, ओळखीचे आणि इतर पाहुण्यांना सांभाळण्याचं कोणतंही दडपण न घेता आपला खास दिवस एन्जॉय करता येतो. लग्न अर्थपूर्ण होण्यासाठी ते भव्य किंवा खर्चिक असलंच पाहिजे असं नाही, यावर आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.