
मुंबई - शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून व्यक्त करण्यात येत होती. दोन्ही पक्षांमधील नेत्यांनी याबाबत अनुकूल वक्तव्य केले होते. एवढे नव्हे तर खुद्द उद्धव ठाकरे यांनी आता तुम्हाला बातमीच देतो असे म्हणत युतीचे संकेत दिले होते. परंतु, आज अचानक वांद्रे येथील ताज लॅंड्स अॅण्ड हॉटेल या हॉटेसमध्ये फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. त्यामुळे ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना तर विराम लागलाच आणि राज ठाकरे भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गट यांच्या महायुतीत सामिल होते, की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बंदद्वार तासभर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या चर्चेचा तपशील कोणालाही समजलेला नाही. परंतु, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर ही भेट झाल्याने मनसे महायुतीत सहभागी होऊ शकते, असे सांगितले जात आहे. त्यामुळे ठाकरे एकत्र येण्याची शक्यता जवळपास मावळली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मैत्री सर्वश्रूत आहे. फडणवीसांनी अनेकदा राज ठाकरे यांची त्यांच्या दादर येतील निवासस्थानी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीनंतर मनसेचा सूर बदलल्याचे दिसून आले आहे. आता पुन्हा एकदा फडणवीसांच्या भेटीनंतर मनसेचा सूर बदलतोय की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशी जोरदार चर्चा होती. मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी ही युती होईल असे सांगितले जात होते. परंतु, अद्याप याबाबत काही ठोस निर्णय झालेला नाही. दोन्ही ठाकरेंनी एकमेकांसमोर अटींची यादी सादर केली असल्याने ठाकरेंचे मनोमिलन लांबणीवर पडले असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे महापालिका प्रभाग रचनांचा आदेश राज्य सरकारने दिला असल्याने निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे. तरीही या दोन नेत्यांमधील चर्चेचे भीजत घोंडगे असल्याचे दिसून येत आहे.