
हवाईसुंदरीचे काम उत्तम संवाद कौशल्य, चांगले व्यक्तिमत्त्व, सौंदर्य, उंची आणि नम्रतेसह कोणीही करू शकते. पण पायलट होणे सोपे काम नाही, त्यासाठी आवश्यक चातुर्य, बुद्धिमत्ता, योग्य प्रशिक्षण आणि शिक्षण आवश्यक आहे. शेकडो लोकांना आकाशात उडवून सुरक्षितपणे जमिनीवर उतरवण्याचे हे काम आपण विचार करतो तितके सोपे नाही, कठोर प्रशिक्षण ते सोपे करते. अशा परिस्थितीत, हवाईसुंदरी म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीने पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
असे स्वप्न पूर्ण करणाऱ्या तरुणीचे नाव खुशबू प्रधान आहे. खुशबूने इंडिगोमध्ये हवाईसुंदरी म्हणून काम सुरू केले. नंतर पायलट होण्याचे ध्येय ठेवून त्यांनी राजीनामा दिला आणि पायलट प्रशिक्षणात सामील झाल्या. आता त्यांनी गगनसखी ते पायलट होण्यापर्यंतचा प्रवास सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो व्हायरल झाला आहे.
खुशबूचा व्हिडिओ तिच्या एअर होस्टेस युनिफॉर्ममध्ये सुरू होतो. नंतर ती पायलट युनिफॉर्ममध्ये बदलते. या १८ वर्षांच्या मुलीला कधीच वाटले नव्हते की ती एके दिवशी पायलट होईल, असे तिने व्हिडिओवर लिहिले आहे.
वर्षानुवर्षे वाट पाहणे, कठोर परिश्रम, संयम, सातत्य आणि कुटुंबाचा पाठिंबा मला इथपर्यंत घेऊन आला आहे. या आशीर्वादाने मी एक महान आणि अभिमानी पायलट होईन याची मला खात्री आहे. माझे भविष्य काय असेल याची मला खात्री आहे कारण मी त्यासाठी काम केले आहे. मी खूप काही अनुभवले आहे, पण प्रत्येक वेळी मी अधिक मजबूत होऊन बाहेर आले आहे. माझ्याकडे लिहिण्यासाठी एक कथा आहे, एक वारसा तयार करण्यासाठी आहे, असे ती म्हणते. पण हा प्रवास फक्त माझा नाही, असेही ती म्हणते. पायलट होणे हे फक्त माझे स्वप्न नव्हते, तर ते माझ्या कुटुंबाचेही स्वप्न होते. त्यांनीही या स्वप्नासाठी माझ्यासोबत काम केले आहे, असे खुशबूने सोशल मीडियावर लिहिले आहे.
या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करून खुशबूला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी आपलेही असेच स्वप्न असल्याचे आणि तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा असल्याचे कमेंट केले आहे. एकाने या प्रशिक्षणाचा खर्च किती येतो असा प्रश्न विचारला आहे. यावर खुशबूने उत्तर दिले की, तुम्ही कॅडेटसाठी जात असाल तर १.३५ कोटी+ रुपये खर्च येतो. यामध्ये तुमचे विमान भाडे, वैद्यकीय खर्च, परीक्षा शुल्क, अर्ज शुल्क, ग्राउंड स्कूल, वेळेचा खर्च आणि विमान प्रवासादरम्यान तुमचे राहण्याचे खर्च, वैद्यकीय विमा इत्यादींचा समावेश आहे.
यासाठी तुम्ही किती पैसे वाचवले होते, असा एकाने कुतूहलाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खुशबू म्हणाली, हा कोर्स खूप महाग असल्याने खूप वेळ लागतो, त्यामुळे एखाद्या व्यक्तीला संपूर्ण रक्कम किंवा त्यातील अर्धी रक्कमही वाचवणे शक्य नाही. मी बचतीत हुशार असूनही, संपूर्ण कोर्ससाठी पैसे वाचवू शकले नाही! ६ वर्षे काम केल्यानंतरही एवढी रक्कम वाचवणे शक्य नाही. त्यामुळे मी ग्राउंड स्कूलमध्ये गुंतवणूक केली आणि नंतर एक हप्ता भरला. माझे पालक आणि पतीने त्यांच्याकडे असलेल्या काही बचतीतून उर्वरित रक्कम भरली.