
मुंबई - कायम वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत येणारे कॉंग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य करुन आपली वाटचाल कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी भाजपला थेट टार्गेट न करता ऑपरेशन सिंदूरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या कॉम्प्युटरवरील व्हिडिओ गेम होता, असे वादग्रस्त वक्तव्य कॉंग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. एकिकडे भाजपकडून ऑपरेशन सिंदूरचे प्रभावी मार्केटिंग सुरु असताना पटोले यांनी केलेल्या वादाने भाजपला चांगल्याच मिरच्या झोंबला आहेत.
भाजपने हल्ला करण्यापूर्वी पाकिस्तानला पूर्वकल्पना दिली होती, त्यामुळे पाकिस्तानला त्यांची माणसे आणि साधनसामग्री हलविण्याची संधी मिळाली, असाही आरोप नानांनी केले आहे. हाच आरोप कॉंग्रेसचे खासदार आणि नेते राहुल गांधी यांनीही यापूर्वी केला होता.
अमेरिकेची धमकी अन् युद्ध संपवण्याचा निर्णय
दरम्यान, अमेरिकेने व्यापारी युद्धाची धमकी दिल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने हे युद्ध थांबवले असा दावाही नानांनी केला आहे. याची कबुली दस्तुरखुदद् अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. आम्ही दोन्ही देशांना धमकवले तेव्हा युद्ध थांबले, असा दावा अनेकदा ट्रम्प यांनी केला आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारत पाकिस्तानवर हल्ला करणार आहे, हे आधीच सांगितले होते. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे कॉम्प्यूटवर गेम खेळण्यासारखे होते, असे नाना म्हणाले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला समाचार
यावर टीका करताना भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले, की कॉंग्रेसचा हात पाकिस्तानला साथ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नानांच्या या वक्तव्याने शहीद जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शौर्याचा अपमान झाला आहे. त्यांना किती वेदना झाल्या असतील. ऑपरेशन सिंदूर धाडसी आणि शौर्याची कारवाई होती.