
मुंबई : बॉम्बे हायकोर्टाने कॅसिनो ऑपरेटर डेल्टा क्रॉपच्या (Delta Corp) नावाने चालवण्यात येणारी फेक आणि अनधिकृत इंस्टाग्रामसह फेसबूक अकाउंट्स हटवण्याचे आदेश मेटाला दिले आहेत. याशिवाय कंपनीचे प्रवर्तक जयदेव मोदी हे ऑनलाइन कॅसिनो सुरू करत असल्याचे भासवणारा एआय जनरेटेड (AI) व्हिडिओही हटवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी 6 ऑगस्ट रोजी डेल्टा क्रॉपने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला आहे. कंपनीच्या नावाने काही फेक सोशल मीडिया अकाउंट्स तयार करण्यात आले आहेत. याशिवाय डेल्टा क्रॉप आणि जयदेव मोदी हे ऑनलाइन जुगाराला प्रोत्साहन देत असल्याचा खोटा दावा केल्याचेही कंपनीने न्यायालयासमोर सांगितले. याशिवाय कंपनीने आम्ही परवाना घेऊनच कॅसिनो चालवतो आणि ऑनलाइन जुगाराच्या व्यवसायात सहभागी नसल्याचे स्पष्ट केले आहे.
न्यायालयासमोर ‘Deltin Vibe’ नावाने पोस्ट करण्यात आलेला एआय जनरेटेड व्हिडिओही सादर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये जयदेव मोदी ऑनलाइन कॅसिनो किंवा ‘Deltin Royale’ नावाचे गेमिंग अॅप सुरू करण्याची घोषणा करत असल्याचे दाखवण्यात आले होते.या व्हिडिओमध्ये काही प्रसिद्ध क्रीडा आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींसह उद्योगपती ऑनलाइन कॅसिनोला समर्थन देत असल्याचेही दाखवण्यात आल्याचा डेल्टा क्रॉपचा आरोप आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी तो खरा असल्यासारखा दिसत असल्याचे म्हटले.सध्या एआय तंत्रज्ञानामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ खरे वाटू शकतात, याकडेही न्यायालयाने लक्ष दिले.
न्यायालयाने डेल्टा क्रॉपच्या याचिकेत नमूद केलेले फेक अकाउंट्ससह कंपनीने 5 ऑगस्ट रोजी मेटाला सांगितलेला एआय जनरेटेड व्हिडिओ हटवण्याचे निर्देश दिले आहेत.याशिवाय भविष्यात डेल्टा क्रॉपच्या निदर्शनास येणारी इतर फेक, अनधिकृत किंवा कंपनीचे कॉपी करणारे डिजिटल अकाउंट्स मेटाकडे तक्रारीद्वारे कळवण्याची परवानगीही न्यायालयाने कंपनीला दिली आहे.