
IndiGo and Air India Planes wings Collide on Mumbai Runway : येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या रनवेवर मंगळवारी रात्री इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांची टक्कर झाली. कोईम्बतूरला जाणाऱ्या एअर इंडिया आणि हैदराबादहून उतरणाऱ्या इंडिगो विमानांचे पंख एकमेकांना घासले.
दोन्ही विमानांमध्ये प्रवासी होते. या घटनेबाबत एअर इंडियाने एक निवेदन जारी केले असून, 'कोणालाही इजा झालेली नाही. प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे,' असे म्हटले आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे विमानांचे इंधन पंखांमध्येच भरलेले असते.
लंडनहून बंगळुरूला जाणाऱ्या बोईंग 787 विमानाच्या इंधन स्विचमध्ये सोमवारी तांत्रिक बिघाड झाल्याच्या वृत्तानंतर, एअर इंडियाने आपल्या सर्व 33 ड्रीमलाइनर विमानांच्या फ्युएल स्विचची तपासणी सुरू केली आहे. बंगळुरूला जाणाऱ्या बोईंग विमानात फ्युएल स्विच 'रन मोड'वर ठेवल्यानंतरही तो 'ऑफ' होत होता. ही एक धोकादायक घटना असून यामुळे अपघात होऊ शकला असता. मात्र, विमानाच्या दोन इंजिनपैकी फक्त एकाच स्विचमध्ये ही समस्या आल्याने विमान कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करत राहिले. या पार्श्वभूमीवर, उर्वरित विमानांच्या इंधन नियंत्रण स्विचची पुन्हा तपासणी सुरू करण्यात आली आहे.