
BMC Election : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत स्वबळावर लढण्याची चाचपणी करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीपासून वेगळे लढतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) तसेच इतर छोटे-मोठे पक्ष सोबत येण्यास तयार असतील, तर तशी आघाडी उभारण्याचे संकेतही देण्यात आल्याचे कळते. बीएमसी निवडणूक महायुतीतून लढवण्याची राष्ट्रवादीची इच्छा असली तरी भाजपकडून नवाब मलिक यांच्या भूमिकेवर सातत्याने आक्षेप घेतला जात आहे.
भाजपकडून नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या निवडणूक सूत्रांवर बोट ठेवण्यात येत असल्याने महायुतीत राहिल्यास भाजप-शिवसेनेची मते राष्ट्रवादीकडे वळणार नाहीत, उलट राष्ट्रवादीची मते या दोन्ही पक्षांकडे जाऊ शकतात, असा निष्कर्ष राजकीय सल्लागारांनी सर्वेक्षणातून काढल्याचे समजते. त्यामुळे वेगळे लढल्यासच पक्षाला फायदा होईल, असा सल्ला मिळाल्यानंतरच स्वबळाचा पर्याय गांभीर्याने विचाराधीन असल्याचे चित्र आहे.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार मर्यादित राहिला असून पक्षफुटीनंतर तो आणखी आकुंचित झाला आहे. सना मलिक या पक्षाच्या एकमेव आमदार ठरल्या आहेत. नवाब मलिक यांच्यावरून भाजपकडून होणारा हल्ला पक्षासाठी अडचणीचा ठरू शकतो, अशी पक्षनेतृत्वाची धारणा आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मुस्लिम मतदारांचा काही हिस्सा काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे वळावा, हा प्रयत्न असून पक्ष ४० जागांवर पूर्ण ताकदीनिशी लढण्याच्या तयारीत आहे. त्यात आणखी १० ते १५ जागांची भर पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळलेले काही मोठे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादी किती जागा लढवणार, हे निश्चित होणार आहे. रणनीतीनुसार भाजपच्या थेट विरोधात फारच कमी जागा लढवण्यात येतील. शिवसेना आणि काँग्रेसचा पारंपरिक जनाधार असलेल्या प्रभागांमध्येच राष्ट्रवादी उमेदवार उभे करण्यावर भर राहील, असे ज्येष्ठ नेत्यांनी सूचित केले आहे.
नवाब मलिक यांच्याकडे बीएमसी निवडणुकीची सूत्रे असताना राष्ट्रवादीला महायुतीत घेऊ नये, असा आग्रह भाजपने धरल्यामुळेच मुंबईत स्वबळावर उतरण्याचे संकेत अधिक स्पष्ट झाले आहेत. या भूमिकेमुळे महायुतीतील तणाव वाढल्याचेही बोलले जात आहे.
फाटाफुटीनंतरही शरद पवार आणि अजित पवार कौटुंबिक कार्यक्रमांत एकत्र आले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत एकत्र येण्याचे संकेत याआधीही देण्यात आले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा मुंबईतील जनाधार मर्यादित असून भाजपकडून त्यांच्या पक्षातील एका मोठ्या नेत्याला आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाशी आघाडी करण्याचा विचार राष्ट्रवादीच्या शीर्षस्थ पातळीवर सुरू असल्याचे समजते.