
BMC Election 2026 : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मनसे-ठाकरे गटाच्या युतीची अधिकृत घोषणा येत्या दोन ते तीन दिवसांत होण्याची शक्यता आहे. दोन्ही नेते संयुक्त भव्य मेळावा घेऊन एकाच व्यासपीठावरून युती जाहीर करणार असल्याची माहिती आहे. या मेळाव्यासाठी मनसे आणि ठाकरे गटाकडून मोठ्या शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वीच, म्हणजे येत्या सोमवारपर्यंत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संयुक्त मेळावा घेऊन युतीची घोषणा करतील, असा दावा केला जात आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याकडे शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत.
राज आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमीलन झाले असले तरी अधिकृत युती कधी होणार, याकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. एकाच व्यासपीठावरून युती जाहीर झाल्यास शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचा अंदाज आहे. या युतीचा फायदा मुंबईसह ठाणे आणि नाशिक महानगरपालिकेत होईल, असे मानले जात आहे.
मनसे-ठाकरे गट युतीची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झाली नसली, तरी 22 डिसेंबरपूर्वी युती घोषित होण्याची शक्यता आहे. सध्या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून ती पुढील दोन-तीन दिवसांत अंतिम होईल, अशी माहिती आहे. युतीच्या घोषणेसोबतच पहिली उमेदवार यादी आणि निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.