
BMC Election 2026 : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असली, तरी अनेक ठिकाणी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी बोटावरील शाई, ईव्हीएम, मतदार यादी आणि दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगाला धारेवर धरले.
मतदान ही काही नवीन गोष्ट नाही, मात्र आज “शाई पुसली जाते का?” असा प्रश्न विचारावा लागतोय, हीच लोकशाहीची शोकांतिका असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजप आणि मित्र पक्षांकडून ईव्हीएम घोटाळा, मतदार यादीतील त्रुटी आणि दुबार मतदारांचे प्रकार समोर येत असल्याचा आरोप त्यांनी केला. “मतदान केंद्रावर भाजपच्या पाट्या लावल्या जात आहेत, शाई पुसली जात आहे. मग निवडणूक आयोग आणि आयुक्त नेमकं काय काम करतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मोबाईल दाखवत मतदार यादीतील विसंगतीकडे लक्ष वेधले. “नाव महिला मतदाराचं आणि नाव पुरुषाचं कसं असू शकतं?” असा प्रश्न उपस्थित करत, गेल्या ९ वर्षांत निवडणूक यंत्रणेत कोणतीही सुधारणा झालेली नाही, अशी टीका त्यांनी केली. माध्यमांतूनच मतदान प्रक्रियेतील गोंधळ समोर येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
महापालिका निवडणुकांमध्ये मतदान आणि मतमोजणीचे दिवस वेगवेगळे ठेवण्यात आले असून, काही प्रभागांमध्ये टपाली मतदानाची प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. “संविधान मतदार करा असं सांगतं, पण आयोग म्हणतो करूनच दाखवा,” अशा शब्दांत त्यांनी व्यवस्थेवर ताशेरे ओढले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, “महायुतीकडे कर्तृत्व नाही. विरोधकांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.” गणेश नाईक यांच्या मतदान केंद्रासंदर्भातही त्यांनी प्रश्न उपस्थित करत, सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला.
बहुतेक ठिकाणी दुबार मतदार आढळत असल्याचा दावा करत, “केवळ शाई नाही, तर लोकशाही पुसली जात आहे,” असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. निवडणूक आयुक्तांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करत त्यांनी आयोगाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवलं.
“मीही शाई पुसून पाहीन, पण दुबार मतदानाला जाणार नाही,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आयोग आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा आरोप केला. “मतदार राजा असतो, आयुक्त नाही. सध्या लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असं सांगत त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन केलं.