
BMC Election 2026 : मुंबई महापालिकेतील महापौर निवडीच्या तोंडावर मोठा राजकीय थरार पाहायला मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के अचानक ‘नॉट रीचेबल’ झाल्याने खळबळ उडाली होती. अखेर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या हस्तक्षेपानंतर डॉ. म्हस्के त्यांच्या पतीसह बुधवारी रात्री उशिरा नार्वेकर यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचल्या आणि राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम मिळाला.
मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ राबवले जात असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, मिलिंद नार्वेकर यांनी तत्काळ हालचाली करत ‘ऑपरेशन मशाल’ हाती घेतले. त्यांनी डॉ. म्हस्के यांच्याशी संपर्क साधत परिस्थिती हाताळली आणि पक्षातील नगरसेवक एकत्र ठेवण्यात यश मिळवले. त्यामुळे ठाकरे गटातील फोडाफोडीचा धोका तात्पुरता तरी टळला आहे.
डॉ. सरिता म्हस्के गेल्या २४ तासांपासून नेमक्या कुठे होत्या, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र त्यांच्या गायब होण्यामुळे ठाकरे गटात चिंतेचे वातावरण होते. पक्षातील वरिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि नातेवाइकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होत नव्हता. याच दरम्यान त्या शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापवले होते.
मुंबई महापालिकेतील गट नोंदणीसाठी कोकण भवन येथे ६५ पैकी केवळ ६४ नगरसेवक उपस्थित राहिले होते. चांदिवली प्रभाग क्रमांक १५७च्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के गैरहजर राहिल्याने संशय अधिक बळावला. त्यामुळे शिवसेना (उबाठा) पक्षातील गट नोंदणीही अपूर्ण राहिली आणि सत्तासमीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
डॉ. म्हस्के सापडल्याने ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला असला तरी महापौर निवड होईपर्यंत महापालिकेतील राजकीय खेळी सुरूच राहणार, हे स्पष्ट झाले आहे. सत्तास्थापनेसाठी सर्व पक्षांकडून नगरसेवकांची पळवापळवी आणि जोरदार हालचाली सुरू राहण्याची चिन्हे आहेत.