जर्मन पर्यटक मुंबईत रडकुंडीला आला, पण तासाभरातच चेहऱ्यावर हसू आलं! पाहा मुंबई पोलिसांनी नेमकं काय केलं?

Published : Dec 16, 2025, 06:40 PM IST
german tourist passport

सार

German Tourist Passport : एका जर्मन पर्यटकाने विमान उड्डाणाच्या काही तास आधी कॅबमध्ये पासपोर्ट असलेली बॅग विसरली. वाकोला पोलिसांनी तत्परता दाखवत, तंत्रज्ञानाच्या मदतीने एका तासात कॅबचा शोध घेऊन बॅग परत मिळवली, ज्यामुळे पर्यटकाला वेळेत विमान गाठता आले

Mumbai News: मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे एका जर्मन पर्यटकाचा परतीचा प्रवास थोडक्यात वाचला. विमान उड्डाणाला अवघे पाच तास असताना कॅबमध्ये विसरलेली पासपोर्टची बॅग वाकोला पोलिसांनी अवघ्या एका तासात शोधून काढली आणि पर्यटकाला वेळेत विमानतळ गाठता आले.

नेमकं काय घडलं?

जर्मनीचा नागरिक रायन एबर्नाऊ (वय 24) रविवारी रात्री साडेबारा वाजता विलेपार्ले येथून वाकोला येथील आपल्या गेस्टहाऊसकडे खासगी कॅबने निघाला होता. त्याच्यासोबत पासपोर्ट, ओळखपत्रे आणि महत्त्वाची प्रवास कागदपत्रे असलेली एक छोटी बॅग होती. रात्री 1 वाजता तो गेस्टहाऊसजवळ उतरला, भाडे दिले आणि खाली उतरला; मात्र पासपोर्टची बॅग कॅबमध्येच विसरला.

काही क्षणांत चूक लक्षात येताच तो पुन्हा बाहेर आला, पण तोपर्यंत कॅब निघून गेली होती. सकाळी त्याची फ्लाइट असल्याने घाबरलेल्या अवस्थेत तो थेट वाकोला पोलीस ठाण्यात धावला.

पोलिसांची तात्काळ कारवाई

परिस्थितीची गंभीरता ओळखून PSI तुषार मुंधे यांनी तात्काळ हरविल्याची नोंद घेतली आणि आपल्या पथकाला कामाला लावले. पोलीस कर्मचारी हजारे, मुन्ने आणि कोळी यांना कॅबचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाहतूक विभागाच्या मदतीने चालान प्रणालीतून कॅबची माहिती मिळवण्यात आली. त्यानंतर लाईव्ह GPS ट्रॅकिंगच्या आधारे पोलीस थेट अंधेरीतील कॅबपर्यंत पोहोचले.

चालकाकडून बॅग सुरक्षित

कॅब चालक संजय कुमार यादव (वय 40) याने पोलिसांना सांगितले की मागील सीटवर त्याला बॅग सापडली होती, मात्र तो त्या वेळी दुसऱ्या प्रवासावर अंधेरीत होता. पोलिसांनी तातडीची गरज समजावून सांगताच चालकाने सर्व काम बाजूला ठेवून अवघ्या 20 मिनिटांत वाकोला पोलीस ठाण्यात हजर होऊन बॅग सुपूर्द केली.

पर्यटकाचा आनंद, पोलिसांचे कौतुक

पासपोर्ट मिळताच आनंदित झालेल्या रायन एबर्नाऊने पोलिसांचे आभार मानत एक थँक यू व्हिडिओही रेकॉर्ड केला. तो म्हणाला, “वाकोला पोलिसांचे मनापासून आभार. त्यांनी अवघ्या एका तासात माझा पासपोर्ट शोधून काढला. अन्यथा मी माझी फ्लाइटच गमावली असती.” यानंतर तो थेट विमानतळाकडे रवाना झाला आणि वेळेत जर्मनीसाठीची फ्लाइट पकडण्यात यशस्वी झाला.

मुंबई पोलिसांचा मानवतेचा चेहरा

या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबई पोलिसांचा तत्परपणा, तांत्रिक कौशल्य आणि संवेदनशीलता समोर आली आहे. परदेशी नागरिकालाही वेळेवर मदत करून मुंबई पोलिसांनी विश्वास जिंकला आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

MHADA Lottery 2026 : म्हाडाकडून नववर्षात आनंदाची भेट! मुंबईसह कोकणातील प्राईम लोकेशनवर मिळणार परवडणारी घरे
BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधू एकत्र; मनसे-ठाकरे गट युतीची लवकरच अधिकृत घोषणा