
मुंबई : मुंबई लोकलचा प्रवास वाढत्या गर्दीमुळे अतिशय कसरतीचा, धावपळीचा आणि तितकाच जीवघेणा ठरतो आहे. लोकल ट्रेन मुंबईची लाइफलाइन आहे. मात्र स्थानकातील प्रचंड गर्दी, सतत उशिरा धावणाऱ्या लोकल, ट्रेनमध्ये शिरण्यासाठी आणि नंतर जागा मिळवण्यासाठी करावी लागणारी धडपड, रेल्वे अपघात असे अनेक प्रश्न मोठ्या चिंतेचा विषय ठरत आहेत. नोकरदार वर्गासह अनेक शालेय आणि कॉलेजचे विद्यार्थीही याच जीवघेण्या गर्दीतून प्रवास करतात. विद्यार्थ्यांच्या या अडचणी पाहता आता रेल्वेने मोठी मागणी केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून भाजपच्या नगरसेवकाकडून महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे.
काय आहे रेल्वेकडे केलेली मागणी?
विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेत, त्यांच्यासाठी लोकल ट्रेनचे तीन डबे खास राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप नगरसेवक तेजस्वी घोसाळकर यांनी ही मागणी केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून ही मागणी त्यांनी केली आहे. १२ डब्यांच्या लोकल ट्रेनमधील तीन डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव तेजस्वी घोसाळकर यांनी मांडला आहे. याबाबत अद्याप केवळ प्रस्ताव मांडण्यात आला आहे. रेल्वेकडून याबाबत कोणताही अधिकृत, अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.
तेजस्वी घोसाळकर यांनी मांडलेल्या प्रस्तावात सांगितलंय, की १२ डब्ब्यांच्या लोकल ट्रेनमध्ये तीन डब्बे शालेय आणि कॉलेज विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवावेत. हे राखीव डब्बे सकाळी ५ वाजल्यापासून ते ११ वाजेपर्यंत देण्यात यावेत. जेन-झी आणि जेन-अल्फा या जनरेशनची लाखो मुलं दररोज लोकल ट्रेनने प्रवास करतात. त्यांची अतिशय गैरसोय होते, गर्दीच्या वेळी त्यांचे अतिशय हाल होतात. अशात अगदी पीक अवर्समध्ये, गर्दीच्या वेळी विद्यार्थ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
तेजस्वी घोसाळकर यांनी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे या दोन्ही रेल्वे मार्गावरील विद्यार्थ्यांसाठी हा प्रस्ताव मांडला आहे. विद्यार्थ्यांसाठी वेगळे, स्वतंत्र डब्बे उपलब्ध झाल्यास त्यांना प्रचंड गर्दीपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. मुलांना शाळा तसंच कॉलेजला जाणं अधिक सुरक्षित होईल.
महत्त्वाची बाब म्हणजे या प्रस्तावावर रेल्वेला सविस्तर अभ्यास करावा लागेल. कारण १२ डब्ब्यांपैकी ३ डब्बे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवले, तर इतर प्रवाशांवर मोठा परिणाम होईल. सामान्य प्रवाशांसाठी असलेले डब्बे कमी पडतील. तीन डबे राखीव ठेवल्याने सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या क्षमतेवर मोठा परिणाम होईल. या सर्व बाबी रेल्वेला तपासाव्या लागतील.